स्थानिक व्यावसायिकांच्या बैठकीत एकमुखी ठराव ; अन्वय प्रभू यांची माहिती


मालवण : दांडी गावा व्यतिरिक्त बाहेरील पर्यटन व्यावसायिकांना दांडी समुद्रकिनाऱ्यावर कोणताही पर्यटन व्यवसाय करण्यास आमचा विरोध राहील अशी एकमुखी भूमिका सागरी पर्यटन व्यावसायिकांच्या बैठकीत घेण्यात आली असल्याची माहिती अन्वय प्रभू यांनी दिली आहे.
शनिवारी दांडी गाव पर्यटन व्यावसायिकांची महत्त्वपूर्ण बैठक पर्यटन व्यावसायिक अन्वय प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली दांडेश्वर मंदिर येथे संपन्न झाली. यावेळी दामोदर तोडणकर, महेश कोयंडे, पांडुरंग पराडकर, दाजी जोशी, अजित आचरेकर, एजास मुल्ला, किरण हुर्णेकर, गौरव प्रभू आदी उपस्थित होते. दांडी समुद्रकिनारी स्थानिक पर्यटन व्यवसायिकांपेक्षा बाहेरील पर्यटन व्यवसायांची संख्या वाढत असल्याचे दिसून आले आहे. बाहेरील व्यवसायांमुळे स्थानिकांना अनेक बंद करण्याची वेळ आली आहे किंवा मोठ्या व्यावसायिक स्पर्धेला सामोरे जावे लागत आहे. अनेकदा बाहेरील पर्यटन व्यावसायिकांमुळे पर्यटन व्यवसायाच्या दर्जावर परिणाम झालेला दिसून आला आहे. यातून धडा घेऊन भविष्यात अशी चूक होऊ नये म्हणून दांडी समुद्र किनाऱ्यावर स्थानिकांव्यतिरिक्त अन्य पर्यटन व्यावसायिकांना आमचा विरोध राहणार असल्याचा एकमुखी ठराव बैठकीत घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे स्कुबा डायविंग, पॅरासेलिंग व अन्य वॉटर स्पोर्ट्स बाबत एकच दर ठरविण्याचे बैठकीत मान्य करण्यात आले. सागरी पर्यटन व्यवसाया संदर्भात नियमावली तयार करण्यासंदर्भात लवकरच एक स्वतंत्र बैठक घेण्यात येणार असल्याचेही अन्वय प्रभू यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Subscribe to my channel




