
मालवण : स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण येथील राष्ट्रीय सेवा योजना (एन एस एस) विभागाच्या वतीने स्वच्छता पंधरवडा, नशामुक्त युवा अभियान आणि ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या अनुषंगाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
महाविद्यालयात सकाळी ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रध्वजाबद्दल आदर, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ व्हावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ध्वजारोहण समारंभात एन एस एस स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. ध्वजारोहणानंतर एन एस एस स्वयंसेवकांनी महाविद्यालय–धुरीवाडा ते कोळंब पूल या मार्गावर जनजागृती रॅली काढली. स्वयंसेवकांनी स्वच्छता, व्यसनमुक्ती आणि सामाजिक जबाबदारी यासंदर्भातील घोषणांनी परिसर दणाणून सोडला. रॅलीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये स्वच्छता राखणे आणि व्यसनांपासून दूर राहण्याबाबत जनजागृती करण्यात आली.
यानंतर २०२६–२७ या वर्षासाठी एन एस एसचे दत्तक गाव म्हणून निवडलेल्या कोळंब येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. कोळंब ग्रामपंचायत कार्यालय परिसरात स्वयंसेवकांनी श्रमदान करून स्वच्छता केली. सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवण्याची सवय आणि सामुदायिक सहभागातून स्वच्छता अभियानाला गती देणे हा या उपक्रमाचा हेतू होता. या अभियानात ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी व कर्मचारी तसेच विविध विभागातील कर्मचाऱ्यांनीही श्रमदान करून सहभाग घेतला. त्यामुळे स्थानिक प्रशासन आणि एन एस एस यांच्यातील सहकार्याला अधिक बळ मिळाले.
यावेळी दत्तक गाव म्हणून एन एस एस विभागाला दिलेल्या सहकार्याबद्दल सरपंच सिया धुरी यांचा एन एस एस विभागाच्या वतीने कार्यक्रम अधिकारी डॉ. सुमेधा नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. उपसरपंच विजय नेमळेकर, ग्रामपंचायत अधिकारी युती चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य विशाल फणसेकर, संपदा प्रभू, संजना शेलटकर आणि नंदा बावकर यांनी उपस्थित राहून अभियानास सहकार्य व प्रोत्साहन दिले. मंडळ अधिकारी मीनल चव्हाण, तलाठी शिवलकर, कोतवाल पाताडे, आरोग्य विभागाचे डॉ. पवार तसेच ग्रामपंचायत कर्मचारी भूपेश ढोलम, जान्हवी कांदळगावकर आणि प्राची पेडणेकर यांनीही स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. ग्रामस्थांच्या वतीने प्रसाद भोजने यांनी उपस्थित राहून अभियानास सहकार्य केले.
ग्रामपंचायत परिसरात राबविलेल्या स्वच्छता उपक्रमाबद्दल सरपंच सिया धुरी यांनी एन एस एस विभागाचे आभार मानले. स्थानिक ग्रामपंचायत, शासकीय यंत्रणा आणि ग्रामस्थांच्या सहभागामुळे स्वच्छता अभियानाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले. यानंतर विद्यार्थ्यांनी कोळंब ग्रामपंचायतीच्या परिसरात फडकविण्यात आलेल्या तिरंग्यासोबत सेल्फी घेत ‘हर घर तिरंगा’ अभियानातील ‘सेल्फी विथ तिरंगा’ या उपक्रमात सहभाग नोंदविला.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रध्वजाबद्दल अभिमान आणि देशभक्तीची भावना दृढ करण्याबरोबरच राष्ट्रभक्तीचा संदेश समाजमाध्यमांच्या माध्यमातून पोहोचविण्यात आला.या संपूर्ण उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष श्रमदान, जनजागृती आणि सामाजिक सहभागाचा अनुभव मिळाला. स्वच्छता, नशामुक्ती आणि राष्ट्रभक्तीचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविताना एन एस एस स्वयंसेवकांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ झाली. या सर्व उपक्रमांचे डॉ. सुमेधा नाईक, डॉ. संकेत बेळेकर, प्रा. योगिता सावंत, प्रा. अनघा टिकले, श्री. गौतम मानवर, कु. रिद्धी काजरेकर आणि कु. अपूर्वा पालव यांनी सूत्रबद्ध नियोजन केले. एन एस एसच्या ३७ स्वयंसेवकांच्या सक्रिय सहभागामुळे सर्व उपक्रम उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडले.






Subscribe to my channel






