निसर्गाचे ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संवर्धन करणे गरजेचे : नगराध्यक्षा वराडकर


मालवण : जागतिक पर्यावरण सप्ताहाचे औचित्य साधून मालवण नगरपरिषदेच्या वतीने गुरुवारी नगरपरिषद परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. मालवण शहराला अधिक हरित, सुंदर आणि प्रदूषणमुक्त बनवण्याच्या उद्देशाने राबवण्यात आलेल्या या मोहिमेत नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांच्यासह पालिकेचे सर्व लोकप्रतिनिधी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या वृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, मुख्याधिकारी प्रतीक थोरात, नगरसेवक सिद्धार्थ जाधव, महेश कांदळगावकर, अश्विनी कांदळकर, महानंदा खानोलकर यांच्यासह सर्व नगरपरिषद कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी पालिकेच्या वतीने पर्यावरण रक्षणाचा आणि सुधारित घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ चा फलकही प्रदर्शित करण्यात आला होता.
वृक्षारोपण प्रसंगी बोलताना नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर म्हणाल्या की, “केवळ ५ जूनला पर्यावरण दिन साजरा करून न थांबता, निसर्गाचे ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. मालवण नगरपरिषद शहरात स्वच्छता मोहिमेसोबतच मोठ्या प्रमाणावर हरित क्षेत्र वाढवण्यासाठी कटिबद्ध आहे. ‘माझी वसुंधरा’ आणि ‘स्वच्छ भारत अभियान २.०’ अंतर्गत आपण आपले प्रभाग आणि परिसर पर्यावरणपूरक बनवले पाहिजेत.” असे त्या म्हणाल्या.
या मोहिमेदरम्यान उपनगराध्यक्ष, पालिकेच्या विविध विषय समित्यांचे सभापती आणि नगरसेवकांनी प्रत्यक्ष खड्डे खणून व रोपे लावून श्रमदान केले. तसेच पालिकेच्या महिला व पुरुष कर्मचाऱ्यांनीही नवीन लावलेल्या झाडांना पाणी घालत या उपक्रमात आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पालिकेच्या या कौतुकास्पद उपक्रमामुळे नगरपरिषद परिसराला एक नवी हिरवाई प्राप्त झाली असून, शहरामध्ये पर्यावरण जनजागृतीचा एक सकारात्मक संदेश गेला आहे.







Subscribe to my channel






