मालवण पं. स. सभापती, उपसभापती निवडणूक बिनविरोध 

सभापतीपदी शिवसेनेच्या प्रज्ञा चव्हाण तर उपसभापतीपदी भाजपच्या श्यामा झाड यांची निवड

शिवसेना, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केले नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण पंचायत समितीच्या सभापती, उप सभापती पदाची निवडणूक अपेक्षेप्रमाणे बिनविरोध झाली आहे. सभापती पदी शिवसेनेच्या प्रज्ञा भाऊ चव्हाण तर उपसभापती पदी भाजपच्या घनश्याम उर्फ श्यामा झाड यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर शिवसेना व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

मालवण पंचायत समिती सभापती उपसभापती पदाची निवड पंचायत समिती सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार गणेश लव्हे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी शिवसेना गटनेते छोटू ठाकूर, सदस्य मानसी भोगावकर, प्रज्ञा दीपक चव्हाण, गणेश तोंडवळकर, रिया बावकर तसेच भाजपचे गटनेते दीपक सुर्वे, सीमा परुळेकर, श्यामा झाड, माधुरी मसुरकर, संतोष गावडे, योजना कांबळी आदी सदस्य उपस्थित होते.

महायुती फॉर्मुलानुसार सभापतीपद शिवसेनेकडे तर उपसभापतीपद भाजपाकडे निश्चित झाले. त्यानुसार सभापती पदासाठी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून आलेले बंद लखोट्यातील पत्र तालुकाप्रमुख मंदार लुडबे यांनी महायुती पदाधिकारी बैठकीत वाचून दाखवत सभापती पदासाठी असलेले प्रज्ञा चव्हाण यांचे नाव जाहीर केले. तर भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी बंद लखोट्यातून वरिष्ठांकडून आलेले पत्र वाचत उपसभापती पदासाठी शामा झाड यांचे नाव जाहीर केले.

खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वात सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती भक्कम आहे. आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात सभापती, उपसभापती व सर्व सदस्य लोकाभिमुख कारभार करतील. जनतेच्या सेवेसाठी आणि गतिमान विकासासाठी महायुती कटीबद्ध असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सांगितले.सभापती, उपसभापती शाम झाड यांचे शिवसेना, भाजपा पदाधिकारी, अधिकारी तसेच मित्र परिवाराकडून अभिनंदन करण्यात आले.

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, माजी उपसभापती राजू परुळेकर, उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, महिला बालकल्याण सभापती अन्वेशा आचरेकर, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस, जि.प. सदस्य क्षमा हडकर, संतोष साटविलकर, सुमेधा पाताडे, नगरसेवक मंदार केणी, ललित चव्हाण, महानंदा खानोलकर यांसह महेश मांजरेकर, संतोष गांवकर, विजय निकम, दाजी सावजी, पंकज वर्दम, शिवरामपंत पालव, युवासेना तालुकाप्रमुख अभि लाड, स्वप्नील गावडे, तालुकाप्रमुख मधुरा तुळसकर, प्रकाश तोंडवळकर, मनोज हडकर, देवानंद लोकेगांवकर, मुन्ना झाड यांसह पदाधिकारी व नातेवाईक मित्रपरिवार यांनी उपस्थित राहून अभिनंदन केले.

error: Content is protected !!