… त्याप्रमाणेच किरीट सोमय्या हल्ला प्रकरणी सुत्रधाराला अटक करून दाखवा
भाजपा ओरोस मंडल तालुकाध्यक्ष दादा साईल यांचे राज्यकर्ते आणि प्रशासनाला आव्हान
कुणाल मांजरेकर
कुडाळ : महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचार आणि अवैध कामांचा कर्दनकाळ असलेल्या माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर सुरक्षारक्षक आणि मीडियासमोर शिवसेनेच्या गुंडांनी केलेला हल्ला निषेधार्ह आहे. हा हल्ला पूर्वनियोजित असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय्य सहाय्यक मिलींद नार्वेकर आणि मंत्री अनिल परब या हल्ल्याचे खरे सूत्रधार आहेत. ज्या प्रकारे राज्य सरकारच्या आदेशानुसार पोलीस प्रशासनाने सिंधुदुर्गातील संतोष परब हल्लाप्रकरणी गल्लीपासून दिल्लीपर्यंत धाव घेतली होती, त्याप्रमाणे आता माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी गुन्हेगारांना शोधून काढून हल्ल्याच्या खऱ्या सूत्रधाराला तात्काळ अटक करावी, असे आव्हान भाजपचे ओरोस मंडल तालुकाध्यक्ष दादा साईल यांनी दिले आहे.
या संदर्भात प्रसिद्धीपत्रकात त्यांनी म्हटले आहे की, पुणे महानगरपालिकेत कोविड सेंटरमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची तक्रार देण्यासाठी आलेल्या भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून हल्ला करून त्यांना अर्वाच्य शिवीगाळ करण्यात आली आहे. यात किरीट सोमय्या जखमी देखील झाले. माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय्य सहाय्यक मिलींद नार्वेकर यांचे फार्महाऊस आणि मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टच्या विरोधात केलेली कारवाईमुळे त्याना या इमारती काढून टाकाव्या लागणार आहेत. त्यामुळे मिलींद नार्वेकर आणि अनिल परब यांच्या मार्फतच हा सगळा प्रकार घडला असण्याची शक्यता आहे.
हेच मिलींद नार्वेकर आणि मंत्री अनिल परब सिंधुदुर्गातील संतोष परब प्रकरणामध्ये आमदार नितेश राणे यांना नाहक गोवण्यासाठी पोलीस बळाचा आणि प्रशासनाचा वापर करून अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन न्यायालयीन प्रक्रियेत देखील हस्तक्षेप करत आहेत. एकीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे सर्व नेते मंडळी संतोष परब यांच्यावर हल्ला झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर दहशतवादाचे आरोप करत आहेत आणि कोणताही संबंध नसताना आमदार नितेश राणे यांना प्रकरणात निष्कारण गोवण्याचा प्रयत्न करत आहेत. पुण्यामध्ये भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला करून त्या ठिकाणी शिवसेना झिंदाबादच्या घोषणा देखील देण्यात आल्या होत्या. आता सिंधुदुर्गातील शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते पुण्यामध्ये जाऊन या हल्लेखोरांचा सत्कार करणार आणि आत्मक्लेश करून घेणार की सिंधुदुर्गमध्ये बसून पोकळ दहशतवादाच्या गप्पा मारणार याचा त्यांनी खुलासा करावा. सिंधुदुर्गातील शिवसेनेचे नेते पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांनी आणि त्यांच्या पिलावळीने दहशतवाद दहशतवाद म्हणून बोंबलण्यापेक्षा महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या भ्रष्ट मंत्री आणि गुंडांना आवर घालावा, असेही दादा साईल यांनी म्हटले आहे.