कोकणात भरपूर पाऊस, तरी पाणीटंचाई का? आत्मपरीक्षणाची वेळ!

सिंधुदुर्गात वनराई बंधाऱ्यांची लोकचळवळ बनल्याचे समाधान : पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) कोकणात दरवर्षी मुबलक पाऊस पडत असतानाही पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होत असेल, तर केवळ निसर्गाला दोष देऊन चालणार नाही. पावसाच्या पाण्याचे नियोजन कितपत केले, त्याचे योग्य संधारण केले का, याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. सध्याची परिस्थिती निसर्गनिर्मित आहे की आपल्या दुर्लक्षाचा परिणाम, याचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.

कोकण पाटबंधारे प्रकल्प, ठाणे आणि दक्षिण पाटबंधारे प्रकल्प, ओरोस यांच्या वतीने आयोजित जल सेवा संकल्प अभियानाचा समारोप शुक्रवारी सिंधुदुर्गनगरी येथे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर, उपाध्यक्ष दादा साईल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे आणि अधीक्षक अभियंता पी. एन. पाटील यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. जलसंपदा विभागाच्या शासन निर्णयानुसार आणि केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हे अभियान राबविण्यात आले.

वनराई बंधाऱ्यांची लोकचळवळ ही समाधानाची बाब

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वनराई बंधारे उभारण्याच्या उपक्रमाला गावागावांतून मिळणारा प्रतिसाद ही समाधानाची बाब आहे. एखादी मोहीम सुरू करणे आणि तिचे लोकचळवळीत रूपांतर होणे, यात मोठा फरक आहे. आज नागरिक एकत्र येऊन गावात आणि शहरात वनराई बंधारे उभारण्यासाठी पुढाकार घेत आहेत. नैतिक जबाबदारी स्वीकारून नागरिक जलसंधारणाच्या कामात सहभागी होत आहेत, ही जिल्ह्याच्या भविष्यासाठी सकारात्मक बाब आहे, असे राणे यांनी सांगितले.

वनराई बंधाऱ्यांच्या माध्यमातून भावी पिढीला पाण्याचे महत्त्व समजावून देण्याचे काम होत आहे. कोकणात भरपूर पाऊस पडतो, या समजुतीतून पाण्याचे महत्त्व अनेकदा दुर्लक्षित झाले. मात्र, पावसाळ्यातील पाणी अडवून त्याचे योग्य नियोजन केले नाही, तर भविष्यातही अशा परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे पाण्याचे महत्त्व केवळ संकटाच्या काळात नव्हे, तर वर्षभर लक्षात ठेवणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

जलसंधारणासाठी नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा

शासन, प्रशासन आणि सामाजिक संस्था जलसंधारणासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, या प्रयत्नांना नागरिकांच्या सक्रिय सहभागाची जोड मिळणे आवश्यक आहे. पावसाचे पाणी अडवणे, साठवणे आणि त्याचा योग्य विनियोग करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. नागरिकांनी ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडल्यास भविष्यात सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकणात पाणीटंचाईसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी मोठी मदत होईल, असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!