सुनिल घाडीगांवकर यांचं दातृत्व कायम ; श्रावण मधील पाण्याचा प्रश्न स्वखर्चातून मिटवला

नळपाणी योजनेला ५ हजार लिटरच्या टाकी व धक्का उभारणी व्यवस्था ; ग्रामस्थांतून समाधान

मालवण : काही दिवसांपूर्वी ओवळीये सडा येथे स्वखर्चाने रस्ता करून देणाऱ्या मालवण पं. स. चे गटनेते सुनील घाडीगांवकर यांनी श्रावण गवळीवाडी येथील ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्नही स्वखर्चातून निकाली काढला आहे.

श्रावण गवळीवाडी येथे २०० ते ३०० लोकवस्ती असलेल्या भागात शासनाच्या नळपाणी योजनेच्या माध्यमातून पाणीपूरवठा होतो. मात्र याठिकाणी बसवण्यात आलेल्या ५ लिटर टाकीतून होणारा पाणीपुरवठा ग्रामस्थांना पुरेसा ठरत नाही. अपुरा व खंडित होणारा पाणीसाठा वाढवून देण्याची मागणी ग्रामस्थांच्या माध्यमातून सुरू होती. शासन दरबारी पाठपुरावा करूनही काम होत नव्हते. अखेर सुनील घाडीगांवकर यांनी ५ लिटरची पाण्याची टाकी तसेच टाकी ठेवण्याची क्षमता असलेला धक्का उभारणी स्वखर्चाने करून दिला आहे. अशी माहिती श्रावण सरपंच तथा भाजप विभागीय अध्यक्ष प्रशांत परब यांनी दिली आहे. यापुढे एकत्रित स्वरूपात १० हजार लिटर क्षमतेने गवळीवाडीला पाणीपुरवठा होणार असून सतत खंडित होणाऱ्या व अपुऱ्या पाणीपुरवठा समस्येतून ग्रामस्थांची सुटका झाली आहे. याबाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत सुनील घाडीगांवकर यांचे आभार मानले आहेत.

जिल्हा परिषद वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांच्या हस्ते या नव्या कामाचा शुभारंभ गटनेते सुनील घाडीगांवकर व सुशांत घाडीगांवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी सरपंच प्रशांत परब, उपसरपंच प्रमोद घाडी, तंटामुक्ती अध्यक्ष शाम परब, सुनील गावडे, प्रशांत सावंत, मंगेश यादव, विजय पुजारे, आबा पुजारे, नारायण बगाड, बाबाजी सावंत, प्रभाकर कावले, योगेश नाटेकर, प्रथमेश सावंत, एकनाथ पुजारे, सूर्यकांत सावंत, विनायक कावले, सतीश सडेकर यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो : श्रावण गवळीवाडी येथे नळपाणी योजना टाकीचा शुभारंभ भाजप गटनेते सुनील घाडीगांवकर यांच्या उपस्थितीत जि. प. बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अन्य पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!