
१० हजार वनराई बंधाऱ्यांच्या जलसंवर्धन मोहिमेला वेग : कणकवली तालुक्यात २ हजार बंधाऱ्यांचे उद्दिष्ट
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यावर निर्माण झालेल्या नैसर्गिक संकटाच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी लोकसहभागातून जलसंधारणाची व्यापक चळवळ उभारण्याचा निर्धार जिल्हा प्रशासनाने केला आहे. याच उपक्रमाला बळ देत राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी हरकुळ बुद्रुक येथे वनराई बंधारा उभारणीच्या कामात स्वतः श्रमदान केले.
कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक येथे वनराई बंधारा बांधकामाचा शुभारंभ पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी त्यांनी ग्रामस्थांसोबत प्रत्यक्ष श्रमदान करून जलसंवर्धनाच्या कामात सहभाग नोंदविला. जिल्ह्यात लोकसहभागातून १० हजार वनराई बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यापैकी कणकवली तालुक्यात २ हजार वनराई बंधारे उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

“दुष्काळाचे संकट कोणत्याही पिढीच्या वाट्याला येऊ नये, यासाठी आजपासूनच जलसंधारणाची कामे व्यापक पद्धतीने हाती घेण्याची गरज आहे. प्रशासन आपली भूमिका बजावत आहे; मात्र या कामाला नागरिकांच्या सक्रिय सहभागाची जोड मिळणे तितकेच आवश्यक आहे,” असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
बंधारे उभारण्यापेक्षा गुणवत्तेला प्राधान्य द्या
वनराई बंधारे केवळ संख्येच्या दृष्टीने उभारण्यापेक्षा त्यांची गुणवत्ता आणि उपयुक्तता महत्त्वाची असल्याचे पालकमंत्री राणे यांनी स्पष्ट केले. ग्रामसेवक आणि पालकमित्रांनी बंधाऱ्यांच्या कामाची गुणवत्ता तपासावी. तसेच प्रत्येक तालुक्यासाठी गुणवत्ता तपासणी व तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी स्वतंत्र टीम नियुक्त करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविणे, भूजलपातळी वाढविणे आणि उपलब्ध जलसाठ्याचे संवर्धन करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे उभारण्यात येणाऱ्या प्रत्येक बंधाऱ्याचा प्रत्यक्ष जलसाठा वाढविण्यासाठी उपयोग झाला पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.

‘पालकमित्र’ संकल्पनेतून गावागावांत जलसंधारणाला तांत्रिक आधार
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी संकल्पित केलेली ‘पालकमित्र’ ही संकल्पना जलसंधारणाच्या मोहिमेला गावपातळीवर प्रभावी दिशा देणारी ठरणार आहे. पालकमित्र गावातील ग्रामस्थ आणि संबंधित शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय साधून वनराई बंधारे तसेच जलतारा निर्मितीच्या कामांना गती देणार आहेत. याशिवाय ‘सिंधु पाहणी’ मोबाईल ॲपच्या माध्यमातून जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या वनराई बंधारे व जलतारा यांच्या कामांची माहिती संकलित केली जाणार आहे. त्यामुळे जलसंधारणाच्या कामांचा आढावा आणि त्याची प्रगती अधिक प्रभावीपणे नोंदविता येणार आहे.
‘प्रशासनासोबत ग्रामस्थांची साथ मिळाली तर जलसुरक्षा मजबूत होईल’
सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच निर्माण झालेल्या नैसर्गिक संकटाचे गांभीर्य लक्षात घेता प्रशासन, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि विविध यंत्रणांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे पालकमंत्री राणे यांनी सांगितले. “आज अडवलेला प्रत्येक थेंब भविष्यातील पाण्याची गरज भागविण्यासाठी महत्त्वाचा आहे. प्रत्येक गावाने आपल्या परिसरातील जलस्रोतांचे संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेतला, तर सिंधुदुर्गची जलसुरक्षा अधिक मजबूत होईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर, कणकवली पंचायत समिती सभापती हर्षदा वाळके, प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सरपंच आनंद ठाकूर यांच्यासह संबंधित अधिकारी, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.







Subscribe to my channel






