
रस्ते न खोदता भूगर्भातून वीजवाहिनी टाकणार; ‘हॉरिझॉन्टल ड्रिलिंग’चे दोन दिवसांत प्रात्यक्षिक
मालवण : मालवण शहरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. संपूर्ण रस्ते न खोदता ‘हॉरिझॉन्टल ड्रिलिंग’ पद्धतीने जमिनीखालून वीजवाहिनी टाकण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. कुंभारमाठ ते तारकर्ली मार्गावर येत्या दोन दिवसांत या तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार असून, त्याकडे मालवणकरांचे लक्ष लागले आहे. आज झालेल्या ‘ऊर्जा मित्र’ समितीच्या बैठकीत हा दिलासादायक पर्याय पुढे आला.
महाराष्ट्र ग्राहक पंचायतीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे महावितरणच्या मालवण उपविभागीय कार्यालयात दर महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी ‘ऊर्जा मित्र’ बैठक आयोजित केली जाते. आज मालवण उपकेंद्रात झालेल्या बैठकीत वीजग्राहकांच्या वैयक्तिक तसेच सार्वजनिक तक्रारींवर महावितरणचे अधिकारी आणि ग्राहक पंचायत प्रतिनिधींमध्ये सविस्तर चर्चा झाली.
रस्ते न खोदता वीजवाहिनी; प्रात्यक्षिकानंतर पुढील निर्णय
मालवण शहरात पारंपरिक पद्धतीने वीजवाहिनी टाकण्यासाठी रस्ते खोदल्यास वाहतूक, नागरिकांची गैरसोय आणि रस्त्यांच्या नुकसानीचा प्रश्न निर्माण होतो. मात्र, ‘हॉरिझॉन्टल ड्रिलिंग’ तंत्रज्ञानाच्या मदतीने रस्ते न खोदता त्यांच्या खालून वीजवाहिनी टाकणे शक्य होणार आहे. कुंभारमाठ ते तारकर्ली मार्गावर होणाऱ्या प्रात्यक्षिकात महावितरण, मालवण नगरपालिका आणि महाराष्ट्र ग्राहक पंचायतीचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. हे प्रात्यक्षिक यशस्वी ठरल्यास शहरातील वारंवार होणारे ट्रिपिंग आणि वीजखंडित होण्याच्या समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. विशेषतः पावसाळ्यात नागरिकांना होणारा त्रास कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
परवानगीशिवाय मीटर बसवल्याचा आरोप; महावितरणच्या कारभारावर ताशेरे
बैठकीत वीजपुरवठ्याच्या तांत्रिक प्रश्नांसोबतच महावितरणच्या कामकाजातील त्रुटींवरही सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मिनीन फर्नांडिस यांच्या घरात त्यांच्या परवानगीशिवाय जबरदस्तीने दुसरा वीजमीटर बसविण्यात आल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला. यासंदर्भात महिनाभर पाठपुरावा करून ऑगस्टमध्ये वकिलामार्फत नोटीस पाठविण्यात आली होती. मात्र, २१ ऑक्टोबरपर्यंतही कारवाई झाली नसल्याचा आरोप करण्यात आला. बैठकीची माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी हालचाली सुरू केल्याने सदस्यांनी महावितरणच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला. तसेच, श्री. खान यांनी नवीन वीजजोडणीसाठी अर्ज केल्यानंतर त्यांना ८ हजार रुपये कनेक्शन शुल्क आकारण्यात आल्याचा मुद्दाही उपस्थित झाला. हे शुल्क नेमके कशासाठी आकारण्यात आले, याबाबत स्पष्ट खुलासा करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे सदस्यांनी सांगितले.
मेढ्यातील वीजवाहिनीचा प्रश्न आठ दिवसांत सोडवणार
मेढा परिसरातील एका ग्राहकाच्या कंपाउंडमधून गेलेल्या वीजवाहिनीचा प्रश्न गेल्या वर्षभरापासून प्रलंबित आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी येत्या आठ दिवसांत बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिले.
गणेशोत्सवातील वीजखंडाबाबत अधिकाऱ्यांची दिलगिरी
गणेश चतुर्थीच्या काळात दर १५ ते २० मिनिटांनी वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला होता. सणासुदीच्या काळात झालेल्या या त्रासाबद्दल बैठकीत सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आचरा, विरण आणि कुडाळ येथून वीजपुरवठ्याचे पर्यायी स्रोत उपलब्ध असतानाही नियोजनातील त्रुटींमुळे वारंवार वीजखंडित होण्याची समस्या निर्माण झाल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आपली चूक मान्य करत दिलगिरी व्यक्त केली.
या बैठकीला महाराष्ट्र ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष श्रीकांत वेंगुर्लेकर, नितीन वाळके, महिला सहसंघटक वफा खान, नीलकंठ मालणकर, शिशुपाल राणे, मिनीन फर्नांडिस आणि नशिखा खान उपस्थित होते. महावितरणच्या वतीने सचिन मेहेत्रे, ग्रामीण सहायक अभियंता राहुल केकान आणि उच्चस्तरीय लिपिक अमोल भोगले सहभागी झाले.
आता हॉरिझॉन्टल ड्रिलिंगच्या प्रात्यक्षिकाकडे लक्ष
मालवणमधील वारंवार वीजखंडित होण्याच्या समस्येवर आधुनिक तंत्रज्ञानातून उपाय शोधण्याचा प्रयत्न महत्त्वाचा मानला जात आहे. मात्र, या उपायाची प्रत्यक्ष परिणामकारकता प्रात्यक्षिकानंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे कुंभारमाठ ते तारकर्ली मार्गावरील प्रात्यक्षिक यशस्वी होते का आणि त्यानंतर महावितरण कोणती ठोस कार्यवाही करते, याकडे मालवणकरांचे लक्ष लागले आहे.







Subscribe to my channel






