‘प्रश्न विचारणारी तरुणाईच भारताला महासत्ता बनवेल’; विज्ञानाची कास धरा : आमदार प्रमोद जठार

विजयदुर्ग किल्ल्यावर १८ वा विश्व हेलियम दिन उत्साहात; ‘हेलियम परिसर’ आणि विज्ञान पर्यटन केंद्राच्या संकल्पनेला चालना

विजयदुर्ग : देश महासत्ता होण्यासाठी केवळ आर्थिक प्रगती पुरेशी नाही, तर देशातील तरुणाईने जागृत होऊन विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारणे गरजेचे आहे. प्रत्येक विषयाचा तर्कशुद्ध विचार करणारी तरुण पिढीच देशाला महासत्तेच्या दिशेने घेऊन जाईल, असा ठाम विश्वास आमदार प्रमोद जठार यांनी व्यक्त केला.

विजयदुर्ग किल्ल्यावर १८ व्या ‘विश्व हेलियम दिना’निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कासार्डे येथील सुनीता शांताराम ट्रस्ट आणि विजयदुर्ग ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने हा विज्ञानमय सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

ढोल-ताशांच्या गजरात विज्ञानाचा जागर

विश्व हेलियम दिनानिमित्त विजयदुर्ग एसटी डेपो ते ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ला अशी भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली. हातात हेलियमने भरलेले फुगे, ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान’च्या घोषणांनी विजयदुर्गचा परिसर अक्षरशः दुमदुमून गेला. विजयदुर्ग हायस्कूल, विजयदुर्ग उर्दू हायस्कूल, देवगड येथील मुकुंदराव फाटक नर्सिंग कॉलेज तसेच दीक्षित फाउंडेशनच्या विद्यार्थिनी मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाल्या. विद्यार्थी, ग्रामस्थ आणि विज्ञानप्रेमींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

विजयदुर्ग विज्ञान आणि पर्यटनाचे केंद्र बनेल’

सायबाचे ओटे येथे हेलियमच्या फलकाला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार प्रमोद जठार यांनी विजयदुर्गच्या ऐतिहासिक वारशासोबत विज्ञान आणि पर्यटनाची सांगड घालण्यावर भर दिला.

विजयदुर्ग येथील आरमार केंद्राचे काम प्रगतीपथावर असून या कामासाठी आणखी ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे, अशी माहिती जठार यांनी दिली. विजयदुर्गचा इतिहास, हेलियमच्या शोधाची पार्श्वभूमी आणि आरमाराचा वारसा यांचा एकत्रित विकास केल्यास या परिसराला जागतिक स्तरावर वेगळी ओळख मिळू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

१८ वर्षांच्या हेलियम दिनाचे फलित आरमार केंद्राच्या रूपाने

इतिहासप्रेमी राजेंद्र परुळेकर यांनी सांगितले की, विजयदुर्ग किल्ल्यावर गेल्या १८ वर्षांपासून विश्व हेलियम दिन साजरा केला जात आहे. सातत्याने करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विजयदुर्गच्या ऐतिहासिक आणि वैज्ञानिक महत्त्वाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले. त्यातूनच येथील आरमार केंद्राच्या उभारणीला चालना मिळाली आहे.

भविष्यात विजयदुर्ग किल्ल्यावर लाईट अँड साऊंड शो उभारण्यात आल्यास पर्यटकांना इतिहासाची अनुभूती देतानाच विजयदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विजयदुर्गला ‘हेलियम परिसर’ म्हणून ओळख मिळावी

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. सुनील आठवले यांनी विद्यार्थ्यांना हेलियम वायूच्या शोधामागील विज्ञान आणि इतिहासाची सविस्तर माहिती दिली. नासा केंद्र तसेच अहमदाबाद येथील इस्रो केंद्राच्या धर्तीवर विजयदुर्ग परिसराला ‘हेलियम परिसर’ अशी स्वतंत्र ओळख मिळावी, अशी संकल्पना त्यांनी मांडली.

सायबाचे ओटे आणि हेलियमच्या शोधाचे महत्त्व आमदार प्रमोद जठार यांनी नव्या पिढीसमोर पुन्हा अधोरेखित केले आहे. आता निधीचीही चिंता नसल्याने विजयदुर्गचा विकास विज्ञान, इतिहास आणि पर्यटन या तिन्ही क्षेत्रांच्या संगमातून होऊ शकतो. त्यामुळे भविष्यात विजयदुर्ग हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे विज्ञान पर्यटन केंद्र म्हणून नावारूपाला येईल, असा विश्वास डॉ. आठवले यांनी व्यक्त केला.

कोल्हापूरहून विशेष उपस्थित असलेले विज्ञानप्रेमी पवन परुळेकर, प्रसाद देवधर आणि रियाज काझी यांनीही यावेळी आपले विचार मांडले.

कार्यक्रमाला देवगड सभापती गणेश राणे, विजयदुर्ग सरपंच रियाज काझी, पंचायत समिती सदस्य रवींद्र तिर्लोटकर, सुप्रिया आळवे, चंद्रहास सावंत, ग्रामपंचायत सदस्य शुभा कदम, दिनेश जावकर, माजी सरपंच प्रसाद देवधर, प्रदीप साखरकर, पोलीस पाटील राकेश पाटील आदी उपस्थित होते. किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणास्तव समितीचे अध्यक्ष गुरुनाथ राणे, भाऊ सामंत आणि विकी तोरस्कर यांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

हेलियमविषयक घोषणांनी आणि आकाशात रंगीबेरंगी फुगे सोडून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. विज्ञानाची आवड, इतिहासाची जाणीव आणि भविष्याचा वेध घेणाऱ्या या उपक्रमामुळे विजयदुर्ग किल्ल्यावरचा विश्व हेलियम दिन यंदाही विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.

error: Content is protected !!