“गावची शाळा टिकली तरच विद्यार्थ्यांचे भवितव्य सुरक्षित!”

आमदार प्रमोद जठारांचा वारगावमध्ये ठाम संदेश; शेठ महादेव केसरकर विद्यालयाला शालेय वाहनाचे लोकार्पण

वारगाव : “गावची शाळा टिकवायची असेल तर समाजाने पुढे आले पाहिजे; शाळा सक्षम झाली तरच ग्रामीण विद्यार्थ्यांचे भवितव्य सुरक्षित होईल!” असा ठाम आणि स्पष्ट संदेश आमदार प्रमोद जठार यांनी वारगाव येथे दिला. वारगाव विकास मंडळ मुंबई संचलित शेठ महादेव वि. केसरकर माध्यमिक विद्यालयाच्या शालेय वाहनाचा लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.

यावेळी बोलताना आमदार प्रमोद जठार यांनी ग्रामीण शाळांच्या अस्तित्वाचा आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा मुद्दा ठामपणे मांडला. “कोकणातील जिल्हा परिषद तसेच ग्रामीण भागातील शाळा टिकवणे ही काळाची गरज आहे. आपल्या गावातील शाळा सुरू ठेवणे आणि ती अधिक सक्षम करणे ही केवळ शासनाची नव्हे, तर समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे. गावची शाळा टिकली तर गावातील विद्यार्थ्यांचे भवितव्य सुरक्षित राहील,” असे स्पष्ट प्रतिपादन त्यांनी केले.

ग्रामस्थ आणि चाकरमान्यांनी एकत्र येत शाळेसाठी वाहन उपलब्ध करून देणे हे समाजाच्या सहभागाचे उत्तम उदाहरण असल्याचे सांगत, आमदार जठार यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या सुविधांसाठी ‘समाज + शासन’ची साथ

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना प्रवासासह अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत शालेय वाहनासारख्या सुविधांमुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शिक्षणाच्या सुविधा मजबूत करण्यासाठी शासनासोबतच माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ आणि चाकरमान्यांनीही पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे आवाहन जठार यांनी केले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर करून मान्यवरांचे स्वागत केले. विद्यालयाच्या वतीने आमदार प्रमोद जठार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास विजय केसरकर, ॲड. श्रीकांत नारकर, अरुण ताम्हकणकर, प्रथमेश राऊत, सुधाकर नर, सुधीर शेट्ये, मुख्याध्यापक वाळके सर, कुबडे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.

माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.वारगावच्या शाळेला मिळालेले शालेय वाहन म्हणजे केवळ विद्यार्थ्यांच्या प्रवासाची सुविधा नसून, “गावची शाळा टिकली पाहिजे आणि ग्रामीण विद्यार्थ्यांचे भवितव्य घडले पाहिजे” या भूमिकेला मिळालेली कृतीशील साथ ठरली आहे.

error: Content is protected !!