नारायण राणेंचं संजय राऊतांवर “सर्जिकल स्ट्राईक” !

लोकप्रभाचे संपादक ते राज्यसभा खासदारकीच्या प्रवासातील अनेक “गुपितं” उघड

कुणाल मांजरेकर

शिवसेना नेते तथा सामनाचे संपादक संजय राऊत यांनी मंगळवारी भाजपासह माजी खा. किरीट सोमय्या आणि ईडीच्या अधिकाऱ्यांवर केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बुधवारी भाजपच्या मुंबईतील कार्यालयात पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांच्यावर सर्जिकल स्ट्राईक केलं आहे. आज शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांमध्ये गणले जाणारे संजय राऊत सामना मध्ये येण्यापूर्वी लोकप्रभा मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल काय लिहायचे, याची कात्रणे सादर करून राज्यसभेची खासदारकी मिळवण्यासाठी बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल त्यांनी कोणती भाषा वापरली होती, या संदर्भात अनेक धक्कादायक खुलासे राणेंनी केले आहेत. याबाबतचे साक्षीदार वेळ पडल्यास समोर आणेन, असे सांगून आताही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत हातमिळवणी करून शिवसेना संपवण्याची सुपारी संजय राऊत यांनी घेतली असून उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर त्यांचा डोळा असल्याचा आरोप राणेंनी केला आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर तातडीने नारायण राणे यांच्या वतीने बुधवारच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे संजय राऊत यांच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे काय बोलणार ? याची सर्वांना उत्सुकता होती. अपेक्षेप्रमाणे या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी संजय राऊत यांचा चांगला समाचार घेतला. संजय राऊत लोकप्रभात असताना उद्धव आणि बाळासाहेब या दोघांवरही टीका करण्याचं त्यांनी सोडलं नव्हतं, आता म्हणतो, माननीय बाळासाहेबांच्या आशीर्वादाने, उद्धव ठाकरेंच्या आशीर्वीदाने…तू पत्रकार नाहीच, संपादक नाही. तुझी भाषा त्या गुणवत्तेची नाहीच. बेकार आरोप करतो. हा काल अस्वस्थ का झाला, हा काल असा बेजाबदार का बोलत होता, असं सांगून प्रवीण राऊतने ईडीला दिलेल्या मुलाखतीनंतर संजय राऊत यांचा थयथयाट सुरू झाल्याचा आरोपही राणेंनी केला आहे.

तसेच राऊतांच्या आरोपावर बोलताना, पत्रकार आहेस, दे पुरावा, तुझी जमीन, 50 एकर 50 लाखात घेतली, बरं ते पैसे आणलेस कुठून, बरं हा सुजीत पाटकर कोण, त्याच्या कंपनीत तुझ्या मुली कशा डायरेक्टर असू शकतात, स्वत: आधी उत्तरं दे, असे म्हणत राणेंनी जोरदार हल्लाबोल चढवला आहे. शिवसेना वाढवण्यासाठी नाहीय, याचं लक्ष्य उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर बसलेत ना तिथे आहे, हा अर्धा नाही पूर्ण राष्ट्रवादीचा आहे, जेव्हा उद्धव ठाकरे पवारांसोबत गेले, तेव्हा संजय राऊतच होते. तुझी कुंडली माझ्याकडे आहे, सगळी बाहेर काढून टाकेन, केलेल्या केसेसबद्दल, झालेल्या व्यवहाराबद्दल मला सगळं माहिती आहे. राऊतांबाबत ईडीच्या अधिकाऱ्यांनी एवढं गप्प बसू नये, थोडी पुजा करावी, त्याशिवाय त्याचं तोंड गप्प नाही होणार, असा इशाराही राणेंनी दिला आहे.

बाळासाहेबांबद्दल बोललेलं मी कधी ऐकून नाही घेतलं, एवढा घाणेरडं बोललेलं आहे, हा कसा झोळी घेऊन फिरायचा, मी पाहिलाय. तुझा प्रवीण राऊतशी संबंध काय? असा सवाल राणेंनी केलाय. अजून बरंच यायचंय. पगारी नेता आहेस तू, फूकट नाही, ओव्हर टाईम करुन कमवतो, प्रवीणच्या चौकशीनंतर आता आपण पण अडचणीत आहोत हे कळल्यावर राऊत घाबरले. त्यामुळे त्यांचा थयथयाट झाला आहे, अशी टीका नारायण राणेंनी केली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!