ठाकरे शिवसेनेच्या सदस्य नोंदणीला मालवणातून उत्स्फूर्त सुरुवात

माजी आ.वैभव नाईक, भाई गोवेकर यांच्या उपस्थितीत अभियानाचा शुभारंभ; तरुणांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

मालवण | प्रतिनिधी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ बुधवारी मालवण शिवसेना शाखेत माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक आणि माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. पहिल्याच दिवशी शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने जिल्ह्यात संघटनात्मक बांधणीला वेग देण्याचे संकेत मिळाले.

यावेळी बोलताना वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करून शिवसेना संघटना अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले. विशेषतः तरुणांनी या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे त्यांनी सांगितले. नाईक म्हणाले, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ या भूमिकेतून काम करत आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी शिवसेनेने अनेकदा सत्तेच्या बाहेर राहून संघर्ष केला असून, सर्वसामान्यांच्या छोट्या-मोठ्या प्रश्नांना न्याय देणे हेच पक्षाचे प्रमुख ध्येय आहे. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेना सातत्याने लढत आली आहे. सत्तेसाठी अथवा राजकारणासाठी हिंदुत्वाचा गैरवापर शिवसेनेने कधीही केला नाही, असा दावा नाईक यांनी केला. सत्ताधाऱ्यांच्या कथित गैरकारभाराविरोधात तरुण वर्ग विविध आंदोलनांच्या माध्यमातून आवाज उठवत असून, या संघर्षाला शिवसेना प्रभावीपणे न्याय देऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले.

जिल्ह्यातील तरुणांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होऊन संघटना बळकट करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन वैभव नाईक यांनी केले.

यावेळी शिवसेना मालवण शहरप्रमुख बाबी जोगी, नगरसेवक मंदार ओरसकर, महेंद्र म्हाडगुत, तपस्वी मयेकर, नगरसेविका अनिता गिरकर, उपशहरप्रमुख उमेश मांजरेकर, महेश जावकर, महिला तालुका समन्वयक पूजा करलकर, शहर संघटिका राधिका मोंडकर, रूपा कुडाळकर, उमेश चव्हाण, सरपंच अमोल वस्त, सरपंच भगवान लुडबे, मयुर करंगुटकर, गौरी सावंत, पोईप उपविभागप्रमुख समीर लाड, छोटू सावजी, किशोर गावकर, मिनेश मयेकर, सुरेश मडये आदी शिवसैनिक उपस्थित होते.

error: Content is protected !!