तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींचा दणदणीत विजय

जिल्हास्तरावर मालवण तालुक्याचे करणार प्रतिनिधित्व; खेळाडूंच्या चमकदार कामगिरीचे सर्वत्र कौतुक

मालवण : क्रीडा व युवा संचालनालय, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने चौके हायस्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या १९ वर्षांखालील मुलींच्या तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत स. का. पाटील संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाने दिमाखदार विजय मिळविला. या विजयामुळे हा संघ आता जिल्हास्तरीय स्पर्धेत मालवण तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.

स्पर्धेत रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट सांघिक खेळ, वेगवान चाली आणि प्रभावी बचावाच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजेतेपद पटकावले. या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी एका मानाची भर पडली आहे.विजयी संघात खुशी सावंत, अंबिका चव्हाण, प्रज्ञा पवार, ममता थवी, माऊली थवी, कोमल गावडे, मानसी धुरत, माहीन शेख, स्वप्नाली भगत, चांदणी राजपूत, सानिका झोरे, तन्वी कुराडे, समीक्षा परब आणि दुर्वा चव्हाण यांचा समावेश आहे.

या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य कैलास राबते, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे अध्यक्ष किरण ठाकूर, कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, सचिव चंद्रशेखर कुशे आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय केनवडेकर यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले असून, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

संघाला श्री. सागर सावंत यांचे मार्गदर्शन लाभले असून मालवण स्पोर्ट्स असोसिएशनचे सहकार्य मिळाले. तालुकास्तरीय विजयानंतर आता जिल्हास्तरावरही दमदार कामगिरी करण्याचा निर्धार या संघाने केला आहे.

error: Content is protected !!