पेंडूर ग्रामस्थांचा रस्त्यासाठी ठिय्या आंदोलनाचा इशारा प्रत्यक्षात

मांड जत्रोत्सवापूर्वी ५ किमी रस्ता पूर्ण करण्याचे बांधकाम विभागाचे आश्वासन; उर्वरित रस्ता मार्च २०२७ पर्यंत होणार

मालवण : पेंडूर गावचे ग्रामदैवत श्री देव वेताळ मंदिरातील संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला १४ दिवसांचा मांड जत्रोत्सव येत्या जानेवारी महिन्यात पार पडणार आहे. मात्र, या जत्रोत्सवापूर्वी कट्टा–पेंडूर–पराड–काळसे–हुबळीचा माळ हा रस्ता नव्याने व दर्जेदार पद्धतीने तयार करावा, या मागणीसाठी पेंडूर ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत पेंडूर नाका येथे ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात सर्वपक्षीय सुमारे १०० ते १२० ग्रामस्थ सहभागी झाले होते.

गेल्या तीन वर्षांपासून या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावरील मोठमोठे खड्डे, उखडलेले डांबरीकरण आणि ठिकठिकाणी झालेली दुरवस्था यामुळे वाहनचालक, विद्यार्थी, रुग्ण तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अपघाताचा धोका वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही गंभीर बनला आहे. विशेष म्हणजे, अवघ्या तीन वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या रस्त्याची अशी अवस्था झाल्याने बांधकामाच्या दर्जाबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

या पार्श्वभूमीवर पेंडूरसह परिसरातील ग्रामस्थांनी एकजूट दाखवत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ठिय्या आंदोलन केले. संपूर्ण रस्त्याचे नव्याने दर्जेदार व टिकाऊ बांधकाम करण्यात यावे, अशी ठाम मागणी यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे करण्यात आली.

आंदोलनाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजित पाटील आणि सहाय्यक अभियंता सूरज गिरी यांनी आंदोलनस्थळी भेट देत ग्रामस्थांशी चर्चा केली. ग्रामस्थांच्या समस्या आणि मागण्या जाणून घेतल्यानंतर कार्यकारी अभियंता अजित पाटील यांनी महत्त्वाचे आश्वासन दिले.

मांड जत्रोत्सवापूर्वी ५ किलोमीटरचा मंजूर रस्ता पूर्ण करून देण्यात येईल, तर उर्वरित रस्त्याचा नव्याने आराखडा तयार करून मार्च २०२७ पर्यंत संपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येईल, असे लेखी आश्वासन त्यांनी दिले. या लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आपले ठिय्या आंदोलन स्थगित केले.

दरम्यान, हा रस्ता केवळ एका गावापुरता मर्यादित नसून परिसरातील अनेक गावांच्या दळणवळणाचा महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे रस्त्याचे काम केवळ आश्वासनापुरते न राहता प्रत्यक्षात आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली. या आंदोलनाला सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे वित्त व बांधकाम सभापती संतोष साठविलकर यांनीही भेट देऊन ग्रामस्थांच्या मागण्यांची दखल घेतली.

error: Content is protected !!