
मालवणमध्ये प्रथमच Ajax मशीनद्वारे M30 मिक्स डिझाईन काँक्रिटचा वापर
उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांच्यासह महायुतीच्या नगरसेवकांकडून पाहणी; दर्जेदार कामाबाबत स्थानिकांकडून समाधान
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवणच्या पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या चिवला बीच परिसरातील रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सुरू झाले आहे. कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नांतून या कामासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान जिल्हास्तर सन २०२५-२६ योजनेअंतर्गत ४९ लाख ९९ हजार ७७५ रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मालवण नगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या या कामाची उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनी मंगळवारी महायुतीच्या नगरसेवकांसह पाहणी केली.
चिवला बीच परिसरात पर्यटकांची वाढती वर्दळ असताना रस्त्याच्या दुरवस्थेमुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांना गैरसोयींचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन आमदार निलेश राणे यांनी रस्त्याच्या नूतनीकरणासाठी पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांतून सुमारे ५० लाखांचा निधी मंजूर झाल्याने या रस्त्याच्या सुधारणेचा मार्ग मोकळा झाला आहे. या कामामुळे परिसरातील दळणवळण अधिक सुलभ होण्यासह पर्यटन विकासालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
Ajax मशीनद्वारे M30 काँक्रिट; आधुनिक बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर
या कामाचे वैशिष्ट्य म्हणजे मालवण शहरात प्रथमच Ajax मशीनद्वारे M30 मिक्स डिझाईन काँक्रिटचा वापर करण्यात येत आहे. आधुनिक यंत्रसामग्रीच्या साहाय्याने काँक्रिट मिश्रण तयार करून बांधकामात गुणवत्ता आणि एकसमानता राखण्यावर भर दिला जात आहे. M30 ग्रेडच्या काँक्रिटचा योग्य प्रमाणात वापर, निर्धारित तांत्रिक निकषांचे पालन आणि आवश्यक क्युरिंग यांमुळे रस्त्याची मजबुती व टिकाऊपणा सुनिश्चित करण्यास मदत होते.
पर्यटनस्थळाकडे जाणारा रस्ता असल्याने या कामाचा दर्जा दीर्घकाळ टिकणे महत्त्वाचे आहे. यासाठी मंजूर तांत्रिक आराखड्यानुसार काम पूर्ण करावे, अशा सूचना पाहणीदरम्यान देण्यात आल्या.
दर्जेदार कामासाठी सूचना; स्थानिकांकडून समाधान
उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनी सहकारी नगरसेवकांसह कामाची माहिती घेतली. चिवला बीचचे पर्यटनातील महत्त्व लक्षात घेऊन रस्त्याचे नूतनीकरण दर्जेदार आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला. आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नांतून निधी उपलब्ध झाल्याबद्दल तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून काम सुरू झाल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत त्यांचे आभार मानले.
या पाहणीवेळी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक महेश कांदळगावकर, नगरसेवक मंदार केणी, ललित चव्हाण, सिद्धार्थ जाधव, पालिकेचे नगर अभियंता राहुल बुर्ले, राजा केरीपाळे, महेश हडकर आदी उपस्थित होते. निधीची उपलब्धता, आधुनिक बांधकाम तंत्रज्ञान आणि गुणवत्तेवर दिलेला भर यामुळे चिवला बीच रस्त्याचे नूतनीकरण मालवणच्या पायाभूत सुविधा व पर्यटन विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे.







Subscribe to my channel






