देवबागातील डॉ. दत्ता सामंत न्यू इंग्लिश स्कुलमध्ये जाण्यासाठी विद्यार्थ्यांना “होडीची” सोय करा…

मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांची तालुका प्रशासनाकडे उपरोधीक मागणी ; विद्यार्थ्यांवर गुडगाभर पाण्यातून शाळेत जाण्याची परिस्थिती

शाळेच्या नजिक असलेल्या वीजेच्या ट्रान्सफॉर्मर पर्यंत पाणी गेल्यास विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका पोहोचण्याची शक्यता

मालवण : मालवण तालुक्यातील देवबाग येथील डॉ. दत्ता सामंत न्यू इंग्लिश स्कुलच्या समोरील रस्त्यावर पावसाचे गुडगाभर पाणी साचले असून या पाण्यातून शालेय मुलांना ये जा करावी लागत आहे. या पाण्यात विद्यार्थी पडल्याची दुर्घटना देखील घडली असून शाळेच्या नजिकच विजेचा ट्रान्सफॉर्मर असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. तरी तालुका प्रशासनाने याठिकाणी तात्काळ पाहणी करुन येथील पावसाचे पाणी निचरा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी केली आहे. प्रशासनाला हे शक्य नसल्यास निदान विद्यार्थ्यांना शाळेत ये जा करण्यासाठी होडी उपलब्ध करुन द्यावी, असा उपरोधीक टोला त्यांनी लगावला आहे.

देवबाग मधील डॉ. दत्ता सामंत न्यू इंग्लिश स्कुल ही पंचक्रोशी मधील एक नावाजलेली शाळा आहे. या शाळेत केवळ देवबागच नव्हे तर आजूबाजूच्या गावातून मुले शिक्षणासाठी येतात. या शाळेच्या समोर दरवर्षी पावसाचे पाणी जमा होते. त्यामुळे विद्यार्थी व येथील ग्रामस्थाना देखील या पाण्यातून वात काढावी लागते. अलीकडे सुरु असलेल्या संततधार पावसात या भागात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने विद्यार्थ्यांना या पाण्यातून वाट काढत शाळेत ये जा करावी लागत आहे. शाळेत येताना या ठिकाणच्या खड्ड्यात पाय अडकून एक दोन मुले खाली पडली. या ठिकाणीच विजेचा ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला आहे. याठिकाणी रस्त्यात साचणारे पाणी गेल्यास मोठी आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे येथील पावसाचे पाणी जाण्यासाठी मार्ग करणे आणि रस्त्याची उंची वाढवणे आवश्यक आहे. तरी तालुका प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी, अन्यथा ग्रामस्थांसमवेत आंदोलन करण्याचा इशारा मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी दिला आहे.

error: Content is protected !!