
६० हून अधिक खेळाडूंचा सहभाग; विजेत्यांची मालवण येथे होणाऱ्या प्रादेशिक स्पर्धेसाठी निवड
चिपळूण : डेरवण येथील एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलात जिल्हास्तरीय टेबल टेनिस निवड चाचणी स्पर्धा उत्साहात पार पडली. रत्नागिरी जिल्ह्यातील ६० हून अधिक खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला. ११, १३, १५, १७ आणि १९ वर्षांखालील मुला-मुलींच्या विविध गटांमध्ये सामने रंगले. रत्नागिरी जिल्ह्याच्या विविध भागांतून आलेल्या खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन करत स्पर्धेत रंगत आणली. विशेषतः १७ आणि १९ वर्षांखालील गटातील सामने अत्यंत अटीतटीचे झाले.
१५ वर्षांखालील मुलांच्या गटात विधीत सकपाळ याने विजेतेपद पटकावले. कुलदीप गोऱ्हारे उपविजेता, तर चिन्मय चव्हाण तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला.१७ वर्षांखालील मुलांच्या गटात अर्णव दळी याने रोमहर्षक लढतींमध्ये बाजी मारत प्रथम क्रमांक मिळविला. वेदांत सुर्वे द्वितीय, तर अधिराज तावडे तृतीय क्रमांकावर राहिला. मुलींच्या गटात पायल बोनबोरे हिने विजेतेपद मिळविले. अनिष्का महाडिक उपविजेती, तर विजयश्री चव्हाण हिने तृतीय क्रमांक मिळविला.

१९ वर्षांखालील मुलांच्या गटातील अंतिम सामना विशेष रंगला. चिन्मय माजुरकर याने दमदार खेळ करत सुवर्णपदक पटकाविले. वेदांत सुर्वे याला रौप्यपदक, तर अधिराज तावडे याला कांस्यपदक मिळाले. मुलींच्या गटात सुहाना भडवळकर प्रथम, दीक्षा मोरे द्वितीय, तर धृवी घाणेकर तृतीय ठरली.
पारितोषिक वितरण समारंभास रत्नागिरी जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष अजित गालवणकर, प्रशिक्षक राकेश खांडेकर, सोमनाथ सुरवसे, प्रदीप यादव आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विजयी खेळाडूंची मालवण, सिंधुदुर्ग येथे होणाऱ्या प्रादेशिक टेबल टेनिस स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा, उत्कृष्ट टेबल आणि योग्य प्रकाशयोजनामुळे स्पर्धेतील सामने अधिक दर्जेदार झाले. अशा स्पर्धांमुळे नवोदित खेळाडूंना स्पर्धात्मक वातावरणाचा अनुभव मिळून त्यांचा आत्मविश्वास वाढतो. नियमित सराव, शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि अशा दर्जेदार स्पर्धांचा अनुभव यामुळे जिल्ह्यातून राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमकणारे खेळाडू निश्चितच घडतील, असे प्रशिक्षक राकेश खांडेकर यांनी सांगितले.






Subscribe to my channel






