भरडनाक्यावर बालकृष्णाच्या विविध रूपांनी जिंकली उपस्थितांची मने; हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीचा भव्य उपक्रम
लहान गटात अनुश्री मेस्त्री प्रथम; मोठ्या गटात गुरु तुळसकर आणि आरव यांनी पटकाविला प्रथम क्रमांक
मालवण : भारतीय संस्कृती, धार्मिक परंपरा आणि भगवान श्रीकृष्णांच्या आदर्श चरित्राची ओळख नव्या पिढीला व्हावी, तसेच बालकलाकारांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती, मालवण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धा २०२६’ ला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. नरक चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला शहरातील भरडनाका येथे पार पडलेल्या या भव्य स्पर्धेत चिमुकल्यांनी साकारलेल्या बालकृष्णाच्या विविध रूपांनी उपस्थितांची मने जिंकली. लहान गटात अनुश्री सुभाष मेस्त्री हिने प्रथम क्रमांक पटकाविला, तर मोठ्या गटात गुरु तुळसकर आणि आरव यांनी प्रथम क्रमांकाची बाजी मारली.
भगवान श्रीकृष्णांच्या बाललीला, जीवनातील विविध प्रसंग आणि त्यांच्या चरित्रातील आदर्शांचे दर्शन घडविणाऱ्या या स्पर्धेत अवघ्या एक वर्षाच्या बालकलाकारापासून विविध वयोगटांतील मुलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. तब्बल चार तास रंगलेल्या या स्पर्धेला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आकर्षक वेशभूषा, कल्पक सादरीकरण आणि श्रीकृष्ण चरित्रातील प्रसंगांच्या प्रभावी चित्रणामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.
मालवण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. ज्योती तोरसकर यांनी स्पर्धेच्या आयोजनामागील संकल्पना स्पष्ट करत भारतीय संस्कृती, परंपरा आणि भगवान श्रीकृष्णांच्या चरित्राचे महत्त्व विशद केले. उद्घाटनप्रसंगी उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पुनम चव्हाण, महिला व बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर, स्पर्धा संयोजक अमित खोत, सहसंयोजक भाऊ सामंत, शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख बबन शिंदे, शिवसेना शहरप्रमुख राजू बिडये, ज्येष्ठ नगरसेविका शर्वरी पाटकर, नीना मुंबरकर, महानंदा खानोलकर, अश्विनी कांदळकर, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक महेश कांदळगांवकर, नगरसेवक रवीकिरण तोरसकर, सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत, उमेश मांजरेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल देसाई आणि शिक्षक प्रभुदास आजगावकर यांनी केले. स्पर्धकांच्या वेशभूषेतील बारकावे, सादरीकरणातील कल्पकता आणि श्रीकृष्ण चरित्रातील प्रसंगांचे चित्रण यांचे परीक्षण करण्यात आले. मोठ्या एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून स्पर्धेची रंगत अधिक वाढली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय सातार्डेकर यांनी केले.
स्पर्धेच्या अभिनव संकल्पनेचे सर्व स्तरांतून कौतुक!
स्पर्धेच्या आयोजनाचे कौतुक करताना नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचे संवर्धन करण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत आवश्यकता असल्याचे सांगितले. बालवयातच मुलांना आपल्या संस्कृतीची, धार्मिक परंपरांची आणि आदर्श व्यक्तिमत्त्वांची ओळख करून देणे महत्त्वाचे आहे. अशा स्पर्धांमुळे मुलांच्या कलागुणांना वाव मिळतो, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो. हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीने सलग दुसऱ्या वर्षी राबविलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी डॉ. ज्योती तोरसकर यांनी भगवान श्रीकृष्णांच्या विविध लीलांचे महत्त्व विशद केले. नरक चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी नरकासुराच्या प्रतिमांच्या माध्यमातून होत असलेल्या उदात्तीकरणाबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी भगवान श्रीकृष्णांच्या चरित्रातील आदर्श, त्यांच्या कार्याचे महत्त्व आणि भारतीय संस्कृतीतील मूल्यांची ओळख नव्या पिढीला करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्या दृष्टीने श्रीकृष्ण चरित्रावर आधारित वेशभूषा स्पर्धा हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगत त्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.
सन्मानचिन्ह, रोख पारितोषिके आणि आकर्षक भेटवस्तू
स्पर्धेतील लहान गटातील बक्षिसे महिला व बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर यांनी पुरस्कृत केली, तर मोठ्या गटातील बक्षिसे स्वच्छता व आरोग्य सभापती पुनम चव्हाण यांनी पुरस्कृत केली. सामाजिक कार्यकर्ते भूषण मेस्त्री यांनी सहभागी सर्व स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू देऊन प्रोत्साहन दिले. विजेत्यांना सन्मानचिन्ह व रोख पारितोषिके, तर सर्व सहभागी स्पर्धकांना गौरवपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
वेशभूषा स्पर्धेचा निकाल
लहान गट :- प्रथम क्रमांक – अनुश्री सुभाष मेस्त्री, द्वितीय क्रमांक – नेत्रा नितीन माणगावकर, तृतीय क्रमांक – ओजस रोहित पाटकर, उत्तेजनार्थ : प्रभाकर रुपेश धुरी, युगांश स्वप्नील केळूसकर, समर्थ विवेक कोरगावकर, रियांश कामतेकर आणि अन्वित अश्विन भोगले. तसेच समर्थ गणेश सातार्डेकर आणि सारा प्रवीण पवार यांना विशेष वेशभूषा सादरीकरणाबद्दल गौरविण्यात आले.
मोठा गट : प्रथम क्रमांक – गुरु तुळसकर आणि आरव, द्वितीय क्रमांक – हार्दिक परुळेकर आणि गजानन मांजरेकर, तृतीय क्रमांक – रेवा सुहास जोशी, उत्तेजनार्थ : सई सुखानंद कांबळी आणि सचिन वराडकर.
स्पर्धेदरम्यान नाट्यदिग्दर्शक गणेश मेस्त्री यांच्या संकल्पनेतून रेवा जोशी हिने दोन नृत्ये सादर केली. तिच्या आकर्षक नृत्याविष्काराला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीचे संयोजक अमित खोत, सहसंयोजक भाऊ सामंत आणि समितीच्या सर्व सदस्यांनी केलेले नियोजन, नागरिकांचे सहकार्य आणि स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे हा सोहळा दिमाखात पार पडला.
स्पर्धेच्या यशस्वितेसाठी नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पुनम चव्हाण, महिला व बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर, राजू बिडये, बबन शिंदे, बंटी केनवडेकर, अमृता फाटक, अनिकेत फाटक, हरेश फडते, गणेश मेस्त्री, प्रशांत हिंदळेकर, गणेश चव्हाण, बबन परुळेकर, महेश कांदळगांवकर, शर्वरी पाटकर, नीना मुंबरकर, ऋषी पेणकर, गुरुनाथ राणे, शिल्पा खोत, अंजली केनवडेकर, विकी तोरसकर, विराज आचरेकर, निखिल वस्त, शेखर मोर्वेकर, भूषण मेस्त्री, सुहास गवाणकर, सौगंध बादेकर, निलेश गवंडी, डॉ. श्रीपाद गिरसागर, नारायण धुरी, साईराज चव्हाण, अविनाश सामंत, प्रसाद हळदणकर, स्वप्नील घाडी, तेजस चव्हाण, शुभम मेस्त्री आणि रुपेश हळदणकर यांच्यासह अनेकांनी मोलाचे योगदान दिले.
कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नागरिकांची मोठी उपस्थिती लक्षात घेऊन वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली. वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यात आल्याने संपूर्ण कार्यक्रम सुरळीत पार पडला. भगवान श्रीकृष्णांच्या विविध रूपांचे दर्शन घडविणारी, बालकलाकारांच्या कल्पकतेला प्रोत्साहन देणारी आणि भारतीय संस्कृतीचा जागर करणारी ही स्पर्धा मालवणकरांसाठी विशेष आकर्षण ठरली. हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या या सांस्कृतिक उपक्रमाचे मान्यवर, पालक आणि नागरिकांकडून सर्वत्र कौतुक करण्यात आले.





Subscribe to my channel




