आडवली मालडी पं. स. मधून भाजपच्या सीमा परुळेकर बिनविरोध ; ठाकरे शिवसेनेच्या रोहिणी राऊत यांची माघार


वायरी भूतनाथ जि. प. मध्ये शिवसेनेच्या संजीवनी लुडबे यांच्याकडून पक्षादेश मानून उमेदवारी अर्ज मागे : अपक्ष उमेदवार अक्षता गावडे यांना शिवसेनेचा पाठींबा
मालवण | कुणाल मांजरेकर
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या अखेरच्या दिवशी नाराजांची समजूत काढण्यात महायुतीच्या नेत्यांना यश आले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दाखल अर्जापैकी १४ तर पंचायत समिती निवडणुकीसाठी दाखल अर्जां पैकी २३ असे मिळून ३७ जणांनी आज आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. दरम्यान, आडवली मालडी पंचायत समिती मतदार संघातून ठाकरे शिवसेनेच्या उमेदवार रोहिणी राऊत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजप उमेदवार सीमा परूळेकर या बिनविरोध विजयी झाल्या आहेत. परूळेकर यांच्या विरोधातील सर्व अर्ज मागे घेण्यात आल्याने भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी विजयाचा जल्लोष साजरा केला. तर वायरी भूतनाथ जिल्हा परिषदेतून शिवसेनेच्या सौ. संजीवनी लुडबे यांनी पक्षादेश मानून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. येथून माजी तालुकाप्रमुख राजा गावडे यांच्या पत्नी व अपक्ष उमेदवार सौ. अक्षता गावडे यांना शिवसेनेने पाठींबा दिला आहे.
दरम्यान, उबाठाच्या आडवली मालडी येथील उमेदवार सौ. राऊत या उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी तहसील कार्यालयात आल्या असता ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी त्यांना थांबवून चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी भाजप पदाधिकारीही राऊत यांच्यासोबत असल्याने काही काळ वातावरण तंग बनले होते. सौ. राऊत यांनी थेट निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे पत्र देत आपण स्वखुशीने उमेदवारी मागे घेत असल्याचे स्पष्ट केले. यामुळे भाजपने पंचायत समितीमध्ये आपले खाते उघडले आहे.
तालुक्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी राजकीय पक्षांची चांगलीच दमछाक झाल्याचे दिसुन आले. शिंदे शिवसेनेकडून अधिकृतपणे एबी फॉर्म देण्यात आलेले भाजपला सोडलेल्या जागांसमोरील आपल्या पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज मागे घेतले. तहसील कार्यालय येथे आज निवडणूक निर्णय अधिकारी शारदा पोवार, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार गणेश लव्हे, कणकवली गटविकास अधिकारी अरूण चव्हाण यांच्या उपस्थितीत उमेदवारी मागे घेण्याची कार्यवाही झाली. यावेळी राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती.
संजीवनी लुडबे यांनी पक्षादेश मानला ; अधिकृत अर्ज मागे
वायरी भूतनाथ जिल्हा परिषद मतदार संघातून शिंदे शिवसेनेकडून माजी जिल्हा परिषद सदस्या संजिवनी लुडबे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यांनी पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म लावून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र पक्षश्रेष्ठींकडून त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे याठिकाणी शिंदे शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजा गावडे यांच्या पत्नी अक्षता गावडे यांना थेट पाठींबा दिला आहे.
आडवली मालडी जिल्हा परिषद गटात सोनाली घाडीगावकर (शिंदे शिवसेना), माधुरी सावंत (ठाकरे शिवसेना), आचरा गटात संजना रेडकर (ठाकरे शिवसेना), वर्षा सांबारी (शिंदे शिवसेना), मसुरे गटात – क्षमा हडकर (भाजप), आनंदी परब (ठाकरे शिवसेना), सुकळवाड गटात गौतमी तळगावकर (वंचित बहुजन आघाडी), पूजा चव्हाण (ठाकरे शिवसेना), सुमेधा पाताडे (शिंदे शिवसेना), पेंडुर गटात संतोष साटविलकर (शिंदे शिवसेना), घनःश्याम राणे (ठाकरे शिवसेना), वायरी भूतनाथ गट साक्षी लुडबे (ठाकरे शिवसेना), अक्षता गावडे (शिंदे शिवसेना पुरस्कृत अपक्ष) हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जिल्हा परिषदेसाठी सहा मतदार संघात १३ उमेदवारांमध्ये लढत होत आहे. तर आज उमेदवारी मागे घेण्याच्या दिवशी १४ उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. यामुळे एकाच ठिकाणी तिरंगी लढत होणार असून इतर ठिकाणी दुरंगी लढत होत आहे.
आमदार निलेश राणे यांची रणनीती यशस्वी
तालुक्यातील युतीच्या उमेदवारांसमोरील ३१ अपक्ष उमेदवारांपैकी तब्बल २८ अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने अपक्षांचे अर्ज मागे घेण्यासाठी आमदार नीलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली खास रणनिती आखण्यात आली होती. आमदार राणे यांच्या रणनिती यशस्वी झाल्याने अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे. यात शिंदे शिवसेनेतील नाराजी १०० टक्के दूर करण्यात आमदार राणे यांना यश आले. तसेच भाजपमधीलही अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने अनेक ठिकाणी दुरंगी लढत होत आहेत. तालुक्यातील निवडणूक आमदार नीलेश राणे यांच्याच नेतृत्वाखाली युतीच्या मार्फत लढविण्यात येणार असल्याचे यावेळी शिंदे शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांकडून स्पष्ट करण्यात आले.
आडवली मालडी पंचायत समिती गण सीमा परुळेकर- बिनविरोध (भाजप), शिरवंडे गण युवराज मेस्त्री (ठाकरे शिवसेना), दीपक चव्हाण (शिंदे शिवसेना), चिंदर गण दीपक सुर्वे (भाजप), समीर लब्दे (ठाकरे शिवसेना), महेंद्र मांजरेकर (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), आचरा गण लवू मालंडकर (ठाकरे शिवसेना), प्रवीण आचरेकर (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), गणेश तोंडवळकर (शिंदे शिवसेना), जुबेर काझी (अपक्ष), कोळंब गण योजना कांबळी (भाजप), पूजा गवंडी (ठाकरे शिवसेना), मसुरे मर्डे गण वैभव चव्हाण (ठाकरे शिवसेना), संजय ठाकूर (शिंदे शिवसेना), पोईप गण प्रज्ञा चव्हाण (शिंदे शिवसेना), शुभ्रा मांजरेकर (अपक्ष), प्राजक्ता परब (ठाकरे शिवसेना), सुकळवाड गण प्रसाद मोरजकर (अपक्ष), प्रणय मयेकर (ठाकरे शिवसेना), संतोष गावडे (भाजप), वराड गण माधुरी मसुरकर (भाजप), दीक्षा रेवडेकर (ठाकरे शिवसेना), पेंडुर गण सप्तशीला धामापूरकर (ठाकरे शिवसेना), रिया बावकर (शिंदे शिवसेना), कुंभारमाठ गण प्रणिता लंगोटे (ठाकरे शिवसेना), मानसी भोगावकर (शिंदे शिवसेना), वायरी भूतनाथ गण पास्कोल रॉड्रीग्ज (ठाकरे शिवसेना), देवानंद लुडबे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), घनःश्याम झाड (भाजप) हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. पंचायत समिती मतदार संघात एका ठिकाणी बिनविरोध झाल्याने आता अकरा जागांसाठी २८ उमेदवार लढत देत आहेत. तर आज उमेदवारी मागे घेण्याच्या दिवशी तब्बल २३ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत.
सीमा परुळेकर यांची बिनविरोध निवड हा युतीचा विजय – धोंडू चिंदरकर
भाजपकडून आडवली मालडी मतदार संघात ठाकरे शिवसेनेला धक्का देण्यात आला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या काही मिनीटामध्ये ठाकरे शिवसेनेच्या उमेदवार रोहिणी राऊत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने त्याठिकाणी भाजपच्या माजी सभापती सीमा परूळेकर या बिनविरोध विजयी झाल्या आहेत. भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी हा युतीचा विजय असल्याचे स्पष्ट केले. युतीचे नेते खासदार नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री नीतेश राणे, आमदार नीलेश राणे यांच्या भक्कम पाठिंब्यावर तालुक्यात युतीच्या सर्वच्या सर्व जागा विजयी होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेले सर्व उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. या सर्व कार्यकर्त्यांचे आम्ही आभार मानतो, अशा शब्दात धोंडी चिंदरकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. आजचा पहिला विजय हा आमच्या यशाची सुरुवात असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभा सिंधुदुर्गातील विजयोत्सवाच्याच सभा ठरणार आहेत, असाही विश्वास श्री. चिंदरकर यांनी व्यक्त केला आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत, महेंद्र चव्हाण, महेश मांजरेकर, अरूण मेस्त्री, सुमीत सावंत, दया हाटले, भाई घाडीगावकर, शुभम मठकर, संतोष बाईत, विजय निकम, सुभाष लाड, दिपक सुर्वे, राजू परुळेकर, संतोष पाताडे आदी उपस्थित होते.
मालवण पं. स. आणि जि. प. वर ठाकरे शिवसेनेचाच झेंडा फडकणार – हरी खोबरेकर
तालुक्यात माजी आमदार वैभव नाईक आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लढाई देणार आहोत. आमचे उमेदवार ठामपणे पक्षाबरोबर असून मालवण पंचायत समितीवर आणि जिल्हा परिषदेवर ठाकरे शिवसेनेचाच झेंडा फडकणार आहे. ठाकरे शिवसेनेच्या इच्छूक उमेदवारांनी अपक्ष म्हणून काही ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. पक्षाकडून त्यांची समजूत काढल्यानंतर त्यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. यामुळे सर्व कार्यकर्ते आणि उमेदवार एकसंघपणे पक्षाचे अधिकृत उमेदवार विजयी करण्यासाठी सज्ज झाले आहेत, असेही श्री. खोबरेकर यांनी स्पष्ट केले.
भाजपच्या विरोधातील शिवसेनेकडून दाखल अर्ज मागे
भाजपच्या अधिकृत उमेदवारांसमोर शिंदे शिवसेनेकडून एबी फॉर्म देण्यात आल्याने युतीमध्ये संघर्ष निर्माण झाला होता. मात्र खासदार नारायण राणे यांनी युतीच्या निर्णयानुसार शिवसेना आणि भाजपला सोडण्यात आलेल्या जागांसमोर एकही पक्षाचा अधिकृत उमेदवार उभा राहू नये असे स्पष्ट आदेश दिल्याने शिंदे शिवसेनेकडूनही दाखल केलेले पक्षाचे अधिकृत उमेदवार मसुरे जिल्हा परिषदमधील राधिका परब, तसेच चिंदर पंचायत समितीमधील पंढरीनाथ हडकर आणि आडवली मालडी मतदार संघातील मानसी वेंगुर्लेकर यांचे उमेदवारी अर्ज मागे घेतले. शिंदे शिवसेनेकडूनही कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात येवून त्यांनीही काही प्रमाणात उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.

Subscribe to my channel




