समुद्रात आंघोळीला उतरले असताना घडली दुर्घटना : तासगांव मधील बाप- मुलगा बचावला
मालवण : आंघोळीसाठी समुद्रात उतरलेल्या तासगांव सांगली येथील बाप व मुलाला पाण्यात बुडत असल्याचे पाहून स्थानिकांनी प्रसंगावधान राखून वाचवल्याची घटना मंगळवारी सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास देवबाग भांजीवाडा किनारपट्टी नजिकच्या समुद्रात घडली. संतोष माळी (४३) व सिद्धार्थ माळी (१६) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तासगाव येथील काही पर्यटक देवबाग येथे पर्यटनासाठी आले होते. यातील चार जण आंघोळीसाठी भांजीवाडी येथील समुद्रात उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेजण समुद्रात बुडू लागले. यावेळी त्यांची आरडाओरड ऐकून येथील बस्त्याव वर्देकर, पीटर वर्देकर, अल्बर्ट वर्देकर या तीन सख्ख्या भावांनी स्वतःच्या जीवाचा विचार न करता समुद्रात उडी घालून समुद्रात बुडत असणाऱ्या या दोन्ही बाप मुलाला बाहेर आणले. त्यांना मालवण येथील खासगी रुग्णालयात उपचार करुन सोडण्यात आले.