ससून डॉकच्या आधुनिकीकरणासह मच्छीमारांच्या हिताच्या विविध विषयांवर चर्चा
मुंबई : मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांची आज ‘सिल्वर ओक’ येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत राज्यातील मत्स्य व्यवसाय, मच्छीमारांच्या हिताचे प्रश्न तसेच बंदर विकासाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा झाली.ससून डॉकच्या आधुनिकीकरणासाठी मत्स्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती नितेश राणे यांनी शरद पवार यांना दिली. यावेळी ‘मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना’ची माहिती पुस्तिकाही त्यांना भेट देण्यात आली.
मत्स्य व बंदरे विभागामार्फत अलीकडच्या काळात घेण्यात आलेल्या विविध महत्त्वपूर्ण निर्णयांची माहितीही राणे यांनी पवार यांना दिली. महाराष्ट्रातील मत्स्य व्यवसायाला चालना देणे, मच्छीमारांच्या हितासाठी प्रभावी उपाययोजना राबविणे आणि बंदरांच्या विकासाला गती देणे या विषयांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली.या भेटीची माहिती नितेश राणे यांनी ‘एक्स’वरील पोस्टद्वारे दिली. राज्यातील मत्स्य व्यवसाय आणि मच्छीमारांच्या प्रश्नांवर वरिष्ठ नेत्यांशी झालेल्या या चर्चेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.