वाशी गावाचा सर्वांगीण विकास करून आदर्श गाव बनवणार – आमदार प्रमोद जठार

संगमेश्वर तालुक्यातील वाशी गावच्या नूतन ग्रामपंचायत इमारतीचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

२० लाखांच्या निधीनंतर अतिरिक्त १० लाखांची मागणीही तत्काळ मंजूर

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील निसर्गसंपन्न वाशी गावाचा केवळ पायाभूत सुविधांचा विकास न करता गावात आर्थिक सुबत्ता आणण्याचा संकल्प आमदार प्रमोद जठार यांनी व्यक्त केला. प्रत्येक कुटुंबाच्या हाताला काम आणि त्यातून उत्पन्न मिळावे, यासाठी सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्यांनी विकासाचा ठोस आराखडा तयार करावा. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल. सार्वजनिक सुविधांसोबत आर्थिक विकासाचे धोरण राबवून वाशी गावाचा आदर्श गाव म्हणून विकास करू, असे आश्वासन त्यांनी दिले. वाशी तर्फ संगमेश्वर येथील नूतन ग्रामपंचायत इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते.

जनसुविधा योजना २०२६ अंतर्गत वाशी ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीसाठी २० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या मागणीनुसार आमदार प्रमोद जठार यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे निधीची मागणी केली होती. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर मंगळवार, ३ नोव्हेंबर रोजी या कामाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी सरपंच तन्वी गानू यांनी इमारतीसाठी आणखी १० लाख रुपयांच्या निधीची मागणी केली. आमदार प्रमोद जठार यांनी ही मागणी तत्काळ मान्य करत संबंधित विभागाला पत्र देण्याची घोषणा केली. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाला भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद गटनेते प्रमोद आधटराव, मंडल अध्यक्ष रुपेश कदम, तालुका सरचिटणीस सचिन बंडागळे, सरपंच तन्वी गानू, उपसरपंच रमण जाधव, तालुका उपाध्यक्ष सतीश पटेल, माजी सरपंच चेतन खामकर, दत्ता नार्वेकर, विलास सुर्वे, विस्तार अधिकारी पारसे, ग्रामसेवक नियती चव्हाण, रत्नाकर बोधे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही इमारत ग्रामस्थांसाठी न्याय मंदिर ठरेल : प्रशांत यादव

वाशी ग्रामपंचायत इमारतीसाठी निधी मिळवून देण्यात आल्याचे समाधान व्यक्त करत भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव म्हणाले की, संगमेश्वर तालुक्याला मंजूर झालेल्या निधीतील पहिलाच निधी वाशी गावाला मिळाला आहे. ठेकेदाराने इमारतीचे काम निर्धारित वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे. या इमारतीचे लोकार्पणही आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ही केवळ ग्रामपंचायत इमारत नसून गावाच्या विकासाचे नवे दालन ठरणार आहे. सर्वसामान्य ग्रामस्थांना न्याय मिळवून देणारे हे न्याय मंदिर बनेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!