मालवणच्या शासकीय तंत्रनिकेतन मध्ये लवकरच स्किल डेव्हलपमेंट सेंटर ; आ. वैभव नाईकांचा पुढाकार
२४ कोटींचा निधी मंजूर ; तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांची माहिती
तंत्रनिकेतन इमारतीच्या नूतनीकरणासाठी प्रस्ताव तयार करा : आ. वैभव नाईक यांच्या सूचना
कुणाल मांजरेकर
मालवण : मालवण येथील शासकीय तंत्रनिकेतनमधील विविध समस्यांबाबत सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून याठिकाणी २४ कोटी रुपये खर्चून स्किल डेव्हलपमेंट सेंटर मंजूर झाले आहे. १ एकर जागेत साकारणाऱ्या या केंद्रासाठी २४ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून याठिकाणी विविध प्रकारचे १७ अभ्यासक्रम शिकवले जाणार आहेत. यात पदवी पासून अगदी दहावी नापास विद्यार्थ्यांना देखील स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांनी याठिकाणी आयोजित कार्यक्रमात बोलताना दिली.
काही दिवसांपूर्वी शासकीय तंत्रनिकेतन मधील विद्यार्थ्यांनी येथील समस्येकडे युवासेनेचे लक्ष वेधले होते. त्यावेळी युवासेना शहरप्रमुख मंदार ओरसकर आणि सहकाऱ्यांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे या समस्या मांडल्यानंतर विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोमवारी तंत्रनिकेतनला भेट देऊन बैठक घेतली. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी देखील याठिकाणी भेट दिली. यावेळी व्यासपीठावर तंत्रशिक्षणचे सहसंचालक प्रमोद नाईक, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ संचालक विनोद मोहितकर, प्राचार्य सुरेश पाटील, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, कुंभारमाठ सरपंच प्रमोद भोगावकर, किरण वाळके यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांनी आ. वैभव नाईक यांच्या कार्याचे कौतुक करून येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या समस्या सातत्याने शासनापर्यंत पोहोचवण्याचे काम आ. नाईक यांच्या कडून होत असल्याचे ते म्हणाले. आमदार वैभव नाईक यांच्या मागणीमुळे स्किल डेव्हलपमेंट सेंटर याठिकाणी सुरू होणार आहे. येथे विविध प्रकारचे १७ अभ्यासक्रम सुरू होणार आहेत. यामध्ये पर्यटनावर आधारित अभ्यासक्रमाचा देखील समावेश आहे. या केंद्रात दहावी नापास विद्यार्थ्यांना देखील स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी संधी दिली जाणार आहे. काळाची गरज ओळखून आ. वैभव नाईक यांनी हा महत्वाचा उपक्रम हाती घेतला असून ग्रामीण भागातील मुलांना याचा लाभ मिळणार आहे, असे ते म्हणाले. त्याशिवाय येथील सुसज्ज प्रयोगशाळेसाठी देखील आ. नाईक यांच्या प्रयत्नांमुळे ५० लाखाचा निधी मंजूर झाला आहे. येथील कोणत्याही समस्या असतील तर कॉलेज प्रशासनाने आमदार वैभव नाईक यांच्याशी संपर्क साधावा, तुमचे प्रश्न निश्चितच सुटतील, असा विश्वास डॉ. अभय वाघ यांनी व्यक्त केला.
इमारतीच्या नुतनीकरणासाठी आराखडा तयार करा : वैभव नाईक
यावेळी आ. वैभव नाईक यांनी शासकीय तंत्रनिकेतन च्या इमारतीला ३० वर्षे पूर्ण झाल्याने येथील इमारतीच्या नूतनीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाशी सल्लामसलत करून आराखडा बनवून घेण्याची सूचना कॉलेज प्रशासनाला केली. पावसाळी अधिवेशनात या इमारतीसाठी निधी मंजूर करून घेण्याचा शब्द यावेळी त्यांनी दिला. उदय सामंत यांच्याकडे उच्च आणि तंत्रशिक्षण खाते आल्यानंतर आपण शासकीय तंत्रनिकेतन मध्ये स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू करण्याची मागणी केली होती. या मागणीला ना. सामंत यांनी तात्काळ होकार दिल्याबद्दल आमदार वैभव नाईक यांनी त्यांचे आभार मानले. येत्या जून महिन्यापासून हे स्किल डेव्हलपमेंट सेंटर कार्यान्वित होईल असे सांगून सिंधुदुर्गात शासकीय डी फार्मसी कॉलेज सुरू करण्यासाठी देखील आपला प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शासकीय तंत्रनिकेतनसाठी ज्या जागा गरजा असतील त्याची यादी आपल्याकडे द्या, त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगून मालवणमधील शासकीय तंत्रनिकेतन अद्यावत असले पाहिजे यासाठी कॉलेज प्रशासनाने प्रयत्न करावेत, या ठिकाणी बाहेरील जिल्ह्यातून विद्यार्थी मोठ्या प्रमाणात येतात त्यामुळे येथे स्विमिंग पूल उभारण्याची सूचना करून त्याबाबतचा आराखडा तयार करण्याच्या सूचना देखील वैभव नाईक यांनी केल्या आहेत.