आडारी डम्पिंग ग्राउंड समोरील रस्त्याची अग्निशमन बंबाद्वारे साफसफाई

ठाकरे शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी यांनी आवाज उठवल्यानंतर पालिकेची कार्यवाही

मालवण : नगरपालिकेच्या आडारी येथील कचरा डम्पिंग ग्राउंड मधील सांडपाणी रस्त्यावर आल्याने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरल्याचा प्रकार ठाकरे शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर आज नगरपालिकेने अग्निशमन बंबाद्वारे हा रस्ता धुवून स्वच्छ केला.प्रशासनाच्या या तातडीच्या कारवाईमुळे स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांनी समाधान व्यक्त करीत बाबी जोगी यांचे आभार मानले आहेत.

ठाकरे शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी यांनी सोमवारी या परिसराची पाहणी करून हा संपूर्ण प्रकार उघडकीस आणला होता. येथून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरच डंपिंग ग्राउंडमधील घाण आणि कचरा पसरल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली होती. यामुळे पादचारी आणि वाहनधारकांचे आरोग्य धोक्यात आले होते. पालिका प्रशासनाच्या या ढिसाळ आणि बेजबाबदार कारभाराबाबत बाबी जोगी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाला धारेवर धरले होते. “हा रस्ता तातडीने साफ केला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा बाबी जोगी यांनी दिला होता.

या आक्रमक इशाऱ्यामुळे जागे झालेल्या पालिका प्रशासनाने आज सकाळीच युद्धपातळीवर काम सुरू केले. पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसह थेट अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले. रस्त्यावर साचलेली सर्व घाण पाण्याने स्वच्छ धुवून काढण्यात आली. बाबी जोगी यांनी वेळेत आवाज उठवल्यामुळेच प्रशासनाने ही तत्परता दाखवली आहे. या भागातील डंपिंग ग्राउंडच्या कचऱ्याचे कायमस्वरूपी नियोजन करावे, जेणेकरून भविष्यात मुख्य रस्त्यावर अशी घाण येणार नाही, अशी मागणीही आता नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.

error: Content is protected !!