मालवणात नगरपालिका प्रशासनाची बेबंदशाही ; आठवडा बाजाराला मज्जाव !
परजिल्ह्यातून आलेल्या भाजी- फळांच्या गाड्या अडवल्या : देउळवाडा येथील प्रकार
नियम फक्त गरीबांना का ? संतप्त व्यापाऱ्यांचा सवाल ; जिल्हा प्रशासनाच्या आदेशाअभावी संभ्रम
कुणाल मांजरेकर
मालवण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अद्याप पर्यंत नियमावली जाहीर केली नसतानाही नगरपालिका प्रशासनाने मालवण शहरात बेबंदशाही सुरू केलीय की काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आठवडा बाजाराला बंदीबाबत कोणतेही अधिकृत आदेश जिल्हा प्रशासनाने अद्याप जाहीर केले नसतानाही मालवण नगरपालिका प्रशासनाने सोमवारी सकाळी आठवडा बाजारासाठी आलेल्या परजिल्ह्यातील भाजी आणि फळांच्या गाड्या देऊळवाडा पुलावर अडवल्या. त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. नगरपालिका प्रशासनाच्या या बेबंदशाही कारभाराबाबत बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या व्यापारी तसेच नागरिकांनी ही नाराजी व्यक्त केली आहे.
राज्यात कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने राज्य सरकारने रविवारी मध्यरात्रीपासून नवीन नियमावली जाहीर केली आहे. मात्र त्या अंतर्गत जिल्हा प्रशासनाकडून अद्यापपर्यंत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात न आल्याने जिल्ह्यात कोणत्या गोष्टी सुरू राहणार आणि कोणत्या गोष्टी बंद राहणार याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. आठवडा बाजाराबाबत देखील प्रशासनाने अद्याप पर्यंत कोणतीही घोषणा केलेली नाही. त्यामुळे दर सोमवारी भरणाऱ्या मालवणच्या आठवडा बाजारासाठी आज पहाटेपासून परजिल्ह्यातील व्यापारी मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झाले. मात्र नगरपालिका प्रशासनाने आठवडा बाजार लावण्यास सक्त मनाई केली. काही व्यापाऱ्यांनी प्रशासनाने अद्यापपर्यंत आठवडा बाजाराबाबत कोणतीही घोषणा न केल्याची बाब निदर्शनास आणून दिली. मात्र येथे उपस्थित पालिका कर्मचाऱ्यांनी बाजार लावण्यास मनाई केल्याने व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.