…. कुणाल मांजरेकर


आंगणेवाडी…. मालवण शहरापासून अवघ्या १५ किमी अंतरावर वसलेली मसुरे गावाची एक छोटीशी वाडी. पण आज या वाडीची महती केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर सातासमुद्रापार पोहोचली आहे. यासाठी निमित्त आहे, भक्तांच्या हाकेला धावून जाणाऱ्या आई भराडी देवीची वार्षिक जत्रा!आज ९ फेब्रुवारी रोजी हा भक्तिसोहळा रंगणार आहे. विशेष म्हणजे, पाठोपाठ कुणकेश्वरची यात्रा आल्यामुळे यंदा मालवणच्या भूमीत भाविकांचा ‘महाकुंभ’च भरलेला दिसेल. सुमारे १२ ते १५ लाख भाविक यात्रेला उपस्थिती दर्शवतील.
यंदा आंगणेवाडीत कोट्यवधींच्या घरात उलाढाल अपेक्षित आहे. नवसाला पावणारी आणि भक्तांची इच्छा पूर्ण करणारी ‘जागृत देवता’ म्हणून देवीची ख्याती आहे. ‘आंगणेवाडी’ हा शब्द कानी पडताच डोळ्यांसमोर उभा राहतो तो अथांग जनसागर! ही केवळ जत्रा नाही, तर सर्व जाती-धर्म आणि पंथांना एकत्र गुंफणारा एक उत्सव आहे. सामान्य भक्तांपासून ते राज्याचे मुख्यमंत्री, बडे उद्योजक, कलाकार आणि खेळाडूंपर्यंत सर्वजण आईच्या चरणी नतमस्तक होतात. वाढती गर्दी पाहून कोकण रेल्वेने खास ‘आंगणेवाडी स्पेशल’ गाड्यांचे नियोजन केले आहे, यावरूनच या सोहळ्याची व्याप्ती लक्षात येते.
‘आंगणे’ नावाच्या ग्रामस्थाची गाय एका विशिष्ट पाषाणावर दूध सोडू लागली. पुढे देवीने स्वप्नात दृष्टांत दिला आणि ‘भरड’ भागातील राईत प्रकट झाल्यामुळे तिला ‘भराडी देवी’ हे नाव पडले.आंगणेवाडीच्या यात्रेची तारीख कोणत्याही पंचांगात नसते, ती ठरवण्याची पद्धत अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. दिवाळीनंतर ग्रामस्थ देवीला कौल लावून शिकारीला जातात. शिकार मिळाल्यानंतरच यात्रेची चर्चा सुरू होते. ही यात्रा दीड दिवस चालते. दुसऱ्या दिवशी दुपारी व्यापारी दुकाने आवरू लागतात, म्हणून याला ‘मोडजत्रा’ म्हणतात. यात्रा संपताच आंगणेवाडीवासीय पुढच्या वर्षीच्या नियोजनाला सुरुवात करतात. हीच या गावची शिस्त आणि श्रद्धा आहे.


मुंबई, ठाणे, पुण्यातील चाकरमानी असोत किंवा सासरी गेलेल्या माहेरवाशिणी आंगणेवाडीची यात्रा म्हणजे सर्वांसाठी ‘घरवापसी’ असते. राजकारण्यांसाठी तर ही यात्रा जनसंपर्काची मोठी ‘पर्वणी’च ठरते. यात्रेच्या निमित्ताने मुंबई, पुणे सारख्या मोठ्या महानगरपालिकांमध्ये वसलेले चाकरमानी आपल्या गावी येतात. नुकत्याच मुंबईसह राज्यातील अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या आहेत. त्यामुळे नव निर्वाचित नगरसेवकांसह यंदा सर्वच पक्षांचे दिग्गज नेते आईच्या चरणी लीन होताना दिसणार आहेत.

Subscribe to my channel




