चिंदरची वीज कोंडी फुटणार; ट्रान्सफॉर्मर क्षमतेत मोठी वाढ!

लब्देवाडी, कुंभारवाडीतील ६३ केव्ही ट्रान्सफॉर्मर होणार १०० केव्हीगावठणवाडीतही नवीन १०० केव्ही ट्रान्सफॉर्मर मंजूर

खासदार नारायणराव राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे आणि भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांचे विशेष प्रयत्न

आचरा : चिंदर गावातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, कमी दाबाची समस्या आणि वाढता वीजभार यामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. जिल्हा नियोजनच्या माध्यमातून गावातील वीजव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, लब्देवाडी आणि कुंभारवाडी येथील विद्यमान ६३ केव्ही क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर बदलून १०० केव्ही क्षमतेचे नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्यात आले आहेत. यासोबतच चिंदर गावठणवाडी येथेही नवीन १०० केव्ही ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्यात आला आहे.

चिंदर परिसरात वाढत्या लोकसंख्येसोबतच घरगुती आणि व्यावसायिक वीजवापर वाढल्याने विद्यमान यंत्रणेवर मोठा ताण निर्माण होत होता. परिणामी वारंवार वीजपुरवठा खंडित होणे आणि कमी दाबाने वीज मिळणे अशा समस्यांना ग्रामस्थांना सामोरे जावे लागत होते. आता वाढीव क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर उपलब्ध होणार असल्याने वीजपुरवठ्याची क्षमता वाढून समस्या मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी भटवाडी येथे खास यात्रेच्या पार्श्वभूमीवर १०० केव्ही क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर करून त्याची पूर्तताही करण्यात आली आहे. त्यामुळे चिंदर गावातील विविध भागांमधील वीजपुरवठा व्यवस्था टप्प्याटप्प्याने मजबूत होत आहे.

या कामांसाठी माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायणराव राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे आणि भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांबद्दल चिंदर ग्रामस्थांच्या वतीने पंचायत समिती सदस्य दीपक सुर्वे यांनी समाधान व्यक्त केले.

चिंदर गावातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला असून, मंजूर झालेल्या नवीन ट्रान्सफॉर्मरमुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

error: Content is protected !!