
कुंभारमाठ मधील ३२ वर्षीय युवकाचे अपघाती निधन ; कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर !
मालवण : पर्यटनासाठी भूतान येथे गेलेल्या मालवण-कुंभारमाठ येथील शैलेश शिवाजी कांबळे (वय ३२) या तरुणाचा मोटरसायकल अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. दि. ११ जुलै रोजी भूतानमधील वेंगडू झांपा ब्रिजवर झालेल्या अपघातानंतर नदीपात्रात कोसळलेल्या शैलेशचा मृतदेह काही दिवसांनी शोधण्यात आला. ओळख पटविण्यासह विविध कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अखेर दि. १० ऑगस्ट रोजी भूतानमध्येच शैलेश याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने मालवण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
शैलेश कांबळे हा मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक शिवाजी केरबा कांबळे (एस. के. कांबळे) यांचा मुलगा होता. शैलेश हा कॉम्प्युटर इंजिनिअर असून त्याचे शालेय शिक्षण मालवणच्या भंडारी हायस्कूलमध्ये झाले होते.
शैलेश हा दि. १ जुलै २०२६ रोजी मालवणहून कलकत्ता मार्गे भूतान येथे पर्यटनासाठी गेला होता. त्याचा मूळ सहलीचा कालावधी ६ जुलैपर्यंत होता. मात्र भूतानमधील विविध पर्यटनस्थळे पाहण्याच्या उद्देशाने त्याने नियमानुसार आपला मुक्काम ११ जुलैपर्यंत वाढविला होता. याबाबत त्याने कुटुंबीयांना मोबाईलवरून माहिती देत ११ जुलै रोजी भूतानहून भारतात परतणार असल्याचे सांगितले होते. मात्र, नियोजित परतीच्या दिवशीच कांबळे कुटुंबीयांवर काळाचा घाला घातला गेला.
जिल्हा प्रशासनाचा फोन अन् कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
दि. ११ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कांबळे कुटुंबीयांना शैलेशच्या अपघाताची अत्यंत धक्कादायक माहिती देण्यात आली. भूतानमध्ये भाड्याने घेतलेल्या दुचाकीवरून प्रवास करत असताना सकाळी सुमारे ६ ते ६.३० वाजण्याच्या दरम्यान त्याचा वेंगडू झांपा ब्रिजवर अपघात झाला. अपघातानंतर तो पुलाच्या बाजूने वाहणाऱ्या नदीपात्रात कोसळल्याची माहिती प्रशासनाने कुटुंबीयांना दिली. भूतानमधील वांगडू पोलीस स्टेशनच्या माध्यमातून शैलेशचा शोध सुरू असल्याचे प्रशासनाकडून त्यावेळी कळविण्यात आले होते. मात्र शोध लागेपर्यंत कुटुंबीयांना अनिश्चितता आणि चिंतेच्या काळातून जावे लागले.
महिनाभरानंतर भूतानमध्येच अखेरचा निरोप
मृतदेह भारतात आणण्याऐवजी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून दि. १० ऑगस्ट रोजी भूतानमध्येच कांबळे कुटुंबीयांनी शैलेशवर अंत्यसंस्कार केले. मुलाच्या अकाली आणि परदेशात झालेल्या मृत्यूने कांबळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.ऐन तारुण्यातील शैलेशचा झालेला हा दुर्दैवी अंत संपूर्ण मालवणकरांसाठीही धक्कादायक ठरला असून कुंभारमाठ परिसरासह मालवणमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
कुटुंबीयांनी घेतली भूतानमध्ये धाव
शैलेशचा शोध लागत नसल्याने कांबळे कुटुंबीयांनी प्रशासनाकडे निवेदन देत भूतान अॅम्बसीच्या माध्यमातून शोधमोहीम अधिक वेगाने राबविण्याची आणि आवश्यक ते सहकार्य मिळवून देण्याची मागणी केली. अपघाताची माहिती मिळताच वडील शिवाजी कांबळे यांच्यासह नातेवाईकांनी भूतान गाठले. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून शैलेशचा शोध सुरू असतानाच काही दिवसांनी त्याचा मृतदेह सापडला. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटविणे, आवश्यक वैद्यकीय व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे आदी कार्यवाही करण्यात आली. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह कांबळे कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.






Subscribe to my channel






