पतपेढीच्या माध्यमातून कोकणवासीयांना सक्षम करणार : अध्यक्ष दीपक परब यांचा निर्धार


तळकोकणात कणकवली, कुडाळ, वेंगुर्ले पाठोपाठ आता मालवणमध्ये शाखा उघडणार
मुंबई : गेली ४४ वर्षे मुंबई आणि कोकणात सहकाराच्या माध्यमातून काम करणाऱ्या परब सहकारी पतपेढीने आपल्या कार्याचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला घेतला आहे. तळकोकणात कणकवली, कुडाळ आणि वेंगुर्ले पाठोपाठ आता मालवणमध्ये आपली शाखा उघडण्याचे ठरवले आहे. या निमित्ताने सहकाराच्या माध्यमातून कोकणवासीयांना सक्षम करण्याचा निर्धार पतपेढीचे अध्यक्ष डॉ. दीपक परब यांनी बोलून दाखवला.
पतपेढीची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच घाटकोपर येथील परब मराठा समाज संस्थेच्या बालविकास व्यायाम मंदिर, पंतनगर येथे पार पडली. यावेळी सभेसाठी मुंबईसह सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भागधारकांची लक्षणीय उपस्थिती होती.परब को- ऑप. क्रेडिट सोसायटी ही सर्वसामान्यांची संस्था आहे. या सोसायटीत परब मराठा समाजातील व्यक्तींबरोबरच इतर समाजातील व्यक्तीही सभासद होऊ शकतात. या सोसायटीत १२ महिने मुदत ठेवीवर ९ टक्के व्याजदर तसेच १५ महिने मुदत ठेवीवर १० टक्के व्याज देण्यात येणार असल्याचे यावेळी श्री. परब यांनी जाहीर केले.
कोकणातील युवक तसेच महिलांना रोजगार सक्षम करण्यासाठी परब पतपेढीने संस्थेचा विस्तार करण्याचे ठरवले असून यासाठी सुलभ पद्धतीने कर्जवाटप करण्यात येणार आहे. निसर्गाने नटलेल्या कोकणाला शाश्वत मार्गाने जपायचे असेल तर तेथील लोकांच्या हाताला रोजगार पूरक व्यवसाय सुरू करण्यासाठी हातभार लागणे गरजेचे आहे. यासाठी सर्व स्तरावर काम करावे लागणार आहे आणि यासाठी परब पतपेढी एक पाऊल पुढे टाकत आहे असे विचार दीपक परब यांनी व्यक्त केले.
यावेळी सभेत सभासदांना महाराष्ट्र राज्य सहकारी संघ यांच्यावतीने शिक्षणाधिकारी प्रभुणे यांनी नवीन आदर्श उपविधीतील बदल या विषयावर प्रशिक्षण दिले. तसेच ज्येष्ठ वकील प्रसाद परब यांच्यामार्फत सहकारी कायदे या विषयावर सहकारातील आधुनिक बदल यावर मार्गदर्शन करण्यात आले. सभेचे सूत्रसंचालन पतपेढीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित परब यांनी केले.
परब मराठा समाजाचे सचिव जी.एस. परब, बालविकास व्यायाम मंदिरचे अध्यक्ष सत्यवान परब, पतपेढीचे माजी अध्यक्ष अशोक परब यांनी सभेला मार्गदर्शन केले. उपाध्यक्ष अनिल परब, सचिव प्रतीक्षा परब, खजिनदार सोमा परब, संचालक शैलेंद्रकुमार परब, प्रभाकर परब, सौ. राधिका परब, निशांत परब, रवी परब, सौ.तनया परब, सल्लागार अशोक बा. परब, अशोक ग. परब उपस्थित होते. समन्वय समिती मध्ये शैलेंद्रकुमार परब, अशोक ग. परब, विनायक परब, मधुसूदन परब, संजय परब, शैलेंद्र परब, गुरूदास परब, जयेंद्र परब यांची निवड करण्यात आली. तसेच जमाखर्चाचा अहवाल सभेत मांडण्यात आला. आभार प्रदर्शन संस्थेचे संचालक प्रभाकर परब यांनी केले. या प्रसंगी दहावी, बारावी व पदवीधर विद्यार्थ्यांचा बापू परब यांच्या हस्ते बक्षिसे देऊन सत्कार करण्यात आला.

Subscribe to my channel




