भजनातून संस्कार, अध्यात्मातून समाजाची एकजूट

मालवणच्या भजन महोत्सवात शिवसेना जिल्हाप्रमुख, उद्योजक दत्ता सामंत यांचे प्रतिपादन; दत्ता सामंत यांचा ‘समाज भूषण’ पुरस्काराने सन्मान

मालवण : भजन ही केवळ करमणुकीची कला नसून संस्कृती, परंपरा आणि अध्यात्माचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणारे प्रभावी माध्यम आहे. भजनातून समाजाला चांगले विचार, संस्कार आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. आजच्या धकाधकीच्या जीवनात अध्यात्माची कास धरल्यास मनःशांतीसोबत जीवनालाही योग्य दिशा मिळते, असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख तथा उद्योजक दत्ता सामंत यांनी केले.

श्री भैरवी देवालय, संतसेना मार्ग, मालवण येथे आयोजित भजन महोत्सव २०२६ च्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी दत्ता सामंत यांना ‘समाज भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच बुवा विनय नांदोस्कर यांचा सत्कार दत्ता सामंत यांच्या हस्ते करण्यात आला.

कोकणच्या मातीत भजन, कीर्तन आणि अध्यात्माची समृद्ध परंपरा आहे. या परंपरेच्या माध्यमातून पिढ्यान्‌पिढ्या संस्कारांची शिदोरी पुढे जात आहे. संतांचे विचार आणि अध्यात्मिक संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात भजनाची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याने अशा महोत्सवांचे आयोजन आवश्यक आहे, असे सामंत यांनी सांगितले. अध्यात्म म्हणजे केवळ देवपूजा नसून माणसाने माणसाशी प्रेमाने वागणे, समाजासाठी योगदान देणे आणि चांगले संस्कार पुढील पिढीला देणे होय. भजनातून भक्तीबरोबरच एकता, बंधुभाव आणि सामाजिक बांधिलकीची भावना दृढ होते. त्यामुळे भजनाची परंपरा अधिक जोमाने पुढे नेण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

आधुनिक जीवनशैली आणि मोबाईलच्या वाढत्या वापराच्या काळात तरुण पिढीला आपल्या संस्कृतीशी जोडणे महत्त्वाचे आहे. भजन, कीर्तन आणि धार्मिक-सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून संतपरंपरेतील विचार तरुणांपर्यंत पोहोचविता येतील, असेही दत्ता सामंत यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती प्रज्ञा चव्हाण, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, नगरसेवक सुदेश आचरेकर, शहर व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, शिवसेना शहरप्रमुख राजू बिडये, नाभिक समाजाचे तालुकाध्यक्ष भाऊ चव्हाण, बाळगोपाळ मंडळाचे अध्यक्ष अंकुश चव्हाण, भैरवी देवालय मंडळाचे अध्यक्ष विजय चव्हाण, आनंद आचरेकर आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन कांता चव्हाण यांनी केले.

error: Content is protected !!