मालवणात जिल्हा काँग्रेस आक्रमक ; ज्ञानेश कुमार यांच्या प्रतिमेचे दहन

निवडणूक आयुक्तांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा ; जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांची मागणी

मालवण : “निषेध असो, निषेध असो… ज्ञानेश कुमार यांचा निषेध असो… लोकशाही गिळंकृत करणाऱ्या सरकारचा निषेध असो…” अशा घोषणांनी गुरुवारी मालवण शहर दणाणून गेले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या ‘लोकशाही वाचवा सप्ताहा’अंतर्गत जिल्हा काँग्रेसच्या वतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांच्या प्रतिमेचे दहन करून काँग्रेसने संताप व्यक्त केला.

ज्ञानेश कुमार यांनी पदाचा गैरवापर करून मतदारांच्या हक्कांवर गदा आणल्याचा आरोप करत त्यांना तात्काळ बडतर्फ करावे, तसेच देशविरोधी कृत्य केल्याचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी केली.

निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात काँग्रेसकडून राज्यभर आंदोलन सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून मालवणात हे आंदोलन करण्यात आले. SIR प्रक्रियेत मतदारांचा घोळ निर्माण करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे. या प्रक्रियेचा गैरफायदा सत्ताधारी भाजपला झाल्याचा दावाही मोंडकर यांनी केला.

“ज्ञानेश कुमार यांनी प्रशासकीय सेवेत आपल्या पदाचा गैरवापर केला आहे. मतदार SIR प्रक्रियेत त्यांनी घोळ केला असून, त्यामुळे लोकशाही प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लोकशाही पायदळी तुडविणाऱ्या या कृतीची जबाबदारी निश्चित करून त्यांना तात्काळ पदावरून हटवावे. अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा मोंडकर यांनी दिला.

दरम्यान, दिल्ली येथे निवडणूक आयोगाच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी-वाड्रा यांच्यावर झालेल्या पोलिसांच्या कारवाईचाही यावेळी निषेध करण्यात आला. या आंदोलनावेळी जिल्हा उपाध्यक्ष मेघनाद धुरी, सरचिटणीस देवानंद लुडबे, ओबीसी प्रदेश सचिव महेश अंधारी, सेवादलाचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, मालवण तालुकाध्यक्ष जेम्स फर्नांडिस, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष सरदार ताजर, महेंद्र मांजरेकर, पराग माणगावकर, बाबा मेंडीस यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!