जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिवराजेश्वराचे दर्शन

राजकोट किल्ल्यालाही भेट ; शिवसैनिकांची मोठी उपस्थिती

मालवण : शिवजयंतीच्या निमित्ताने गुरुवारी शिवसेनेच्या वतीने किल्ले सिंधुदुर्ग आणि राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन पदाधिकाऱ्यांनी जनसेवेचा संकल्प सोडला.सकाळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील पदाधिकारी, नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य आणि नगरसेवकांनी किल्ले सिंधुदुर्ग येथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले. त्यानंतर राजकोट येथे उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नतमस्तक होत आशीर्वाद घेतले.

यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि त्यांचे संस्कार हेच आमच्यासाठी मार्गदर्शक आहेत. सर्व लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जनतेची प्रामाणिक सेवा करावी, अशी प्रार्थना आम्ही महाराजांच्या चरणी केली आहे. समाजाची सेवा करण्याची शपथ आम्ही आज घेतली आहे. मालवणच्या विकासाबाबत बोलताना त्यांनी आमदार निलेश राणे यांच्या कार्याचा गौरव केला. गेल्या सव्वा वर्षांपासून आमदार निलेश राणे या मतदारसंघात सक्रिय आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असून मालवण हे त्याचे मुख्य केंद्र आहे. या भागात पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी आणि पर्यटकांना उत्तम सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना आता मोठे यश मिळत असल्याचे दिसून येत आहे, असेही सामंत यांनी नमूद केले.

यावेळी माजी जिल्हाप्रमुख संजय पडते, काका कुडाळकर, नगराध्यक्षा ममता वराडकर, दीपक पाटकर, मंदार लुडबे, दादा साईल, सुनील घाडीगांवकर यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!