कणकवलीत अल्पवयीन मुलीच्या विवाहप्रकरणावरून भाजप आक्रमक; ‘लव्ह जिहाद’चा आरोप

हिंदू मुलीशी विवाहासाठी जिल्हा निबंधकांकडे अर्ज केल्याचा भाजपचा आरोप ; अर्ज मागे घेतल्याची माहिती

“राणेंच्या जिल्ह्यात असे प्रकार खपवून घेणार नाही” – नगरसेवक राकेश राणे

कणकवली : अल्पवयीन हिंदू मुलीशी प्रेमसंबंध निर्माण करून ती सज्ञान झाल्यानंतर तिच्याशी विवाह करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या प्रकरणाला ‘लव्ह जिहाद’चे स्वरूप असल्याचा दावा करत कणकवलीतील भाजप पदाधिकाऱ्यांनी संबंधित विवाहप्रयत्न रोखल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.

कणकवलीतील खासदार नारायण राणे यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत नगरसेवक राकेश राणे यांनी या प्रकरणाची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित २७ वर्षीय मुस्लिम युवकाने हिंदू मुलीशी विवाह करण्यासाठी जिल्हा निबंधक कार्यालयात अर्ज केला होता. सदर युवतीच्या कुटुंबीयांनी याबाबत भाजप पदाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर या प्रकरणात हस्तक्षेप करण्यात आला.

भाजप पदाधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, संबंधित युवतीला या विवाहास विरोध होता. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून कुटुंबाला मदत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर संबंधित युवकाने जिल्हा निबंधक कार्यालयातील विवाह नोंदणीचा अर्ज मागे घेतला असून, भविष्यात असे कृत्य करणार नसल्याचे लेखी दिल्याचे राकेश राणे यांनी सांगितले.

“हिंदू युवतींना फसवून अशा प्रकारे विवाह करण्याचा प्रयत्न होत असेल, तर भाजपा गप्प बसणार नाही. राणेंच्या जिल्ह्यात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत,” असा इशारा राकेश राणे यांनी दिला. पालकमंत्री नितेश राणे हिंदू समाजाच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवत असून समाजाच्या संरक्षणासाठी काम करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

या पत्रकार परिषदेला भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, नगरसेविका मेघा गांगण, नगरसेवक स्वप्नील राणे, तसेच मेघा सावंत, मनस्वी मिथुन ठाणेकर, आर्या औदुंबर राणे, प्रतीक्षा सावंत, महेश सावंत आणि औदुंबर राणे उपस्थित होते.

error: Content is protected !!