वैभववाडी : वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा घाटात आज रात्री साडेनऊच्या सुमारास अचानक मोठी दरड कोसळल्याची घटना घडली. यामुळे मार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी ठप्प झाली होती. मात्र, प्रशासनाकडून तात्काळ कार्यवाही करत रस्ता वाहतुकीसाठी खुला करून देण्यात आला आहे. यामुळे घाटमार्गातून एकेरी वाहतूक सुरू झाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रशासनाशी चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा घेत आवश्यक सूचना दिल्या. दरड कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. रात्रीची वेळ आणि सुरू असलेल्या पावसामुळे रस्ता साफ करण्याच्या कामात काही प्रमाणात अडथळे येत होते. मात्र, जेसीबीच्या साहाय्याने दरड हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असून घाटमार्गातून एकेरी वाहतुकीस प्रारंभ झाला आहे. अचानक वाहतूक बंद झाल्याने काही काळ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र, प्रशासनाच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे अडकून पडलेल्या प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. प्रशासनाने नागरिकांना घाटमार्गातून प्रवास करताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.