
बाजारपेठेतील “त्या” धोकादायक इमारतीला नगरपालिकेकडून फक्त “नोटीस पे नोटीस” ; पालिकेची नोटीस कचऱ्यात टाकून इमारतीचा बिनदिक्कत वापर

नगरपालिका प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष : मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांच्याकडून नाराजी
मालवण : मालवण बाजारपेठेत मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सदानंद कमलाकर मयेकर यांच्या मालकीची घर नं. १८९९ ही इमारत धोकादायक बनली असून या इमारतीचा स्लॅब कोसळू लागला आहे. गेली चार ते पाच वर्ष नगरपालिकेकडून या इमारतीला फक्त नोटीसा काढून इमारतीचा वापर करू नये, अशा सूचना पालिका प्रशासनाकडून देण्यात येत असून तरी देखील या इमारतीचा वापर सुरु आहे. रविवारी मुंबईतील मानखुर्द येथे तीन मजली धोकादायक इमारत कोसळून आठ जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर सोमवारी ६ जुलै रोजी नगरपालिकेने या इमारतीला पुन्हा एकदा नोटीस बजावत इमारतीचा वापर थांबावावा, असे बजावले. मात्र तरीही आज देखील ही इमारत वापरात आहे. त्यामुळे मालवणात मानखुर्द दुर्घटनेची पुनरा वृत्ती होण्याची नगरपालिका प्रशासन वाट पाहतेय का? असा सवाल मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी केला आहे.
बाजारपेठेतील सदानंद मयेकर यांच्या मालकीच्या या इमारतीत पालव टेलर्स हे दुकान आणि वरच्या मजल्यावर दोन भाडेकरू आहेत. हे भाडेकरू येथे राहत नाहीत. हीइमारत धोकादायक असल्याने स्थानिक नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. मागील चार ते पाच वर्ष नगरपालिकेकडून सदानंद मयेकर यांना नोटीस पाठवून या इमारतीचा वापर थांबवण्याच्या सूचना करण्यात येत आहेत. मात्र या नोटीसीला केराची टोपली दाखवण्यात येत असून इमारतीचा वापर बिनदिक्कतपणे सुरु आहे.
चार दिवसांपूर्वी रात्री याठिकाणचा स्लॅब कोसळल्याने स्थानिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. तर मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी याठिकाणची पाहणी करुन ही धोकादायक इमारत तात्काळ बंद करुन याची दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी किंवा दुरुस्ती करुन घेण्याची मागणी केली आहे. अलीकडे सातत्याने या इमारतीचा वरचा भाग कोसळत असून नजिकच्या रहिवाशांना जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे.
जागा मालक आणि भाडोत्री वादात सर्वांचा जीव टांगणीला….
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या इमारतीचे मालक आणि भाडेकरू यांच्यात वाद सुरु आहेत. जागा मालक इमारत दुरुस्त करण्यासाठी भाडोत्री यांना जागा खाली करण्यास सांगत असून जुने भाडेकरू असल्यामुळे ते जागा सोडण्यास तयार नाहीत. यावरून मालकाने वकीलमार्फत नोटीसा देखील बजावल्याचे समजते. आता देखील इमारतीचा वापर बंद केल्यास जागा मालकाला फायदा होण्याच्या कारणास्तव भाडेकरू जागा खाली करण्यास तयार नाहीत. त्यामुळे जागा मालक आणि भाडोत्री वादात सर्वांचा जीव टांगणीला लागला असून यातून दोघांनी सुवर्ण मध्य काढून तात्काळ या धोकादायक इमारतीचा वापर बंद करावा. अन्यथा पालिकेने आपले अधिकार वापरून ह्या धोकादायक इमारतीवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
मानखुर्द दुर्घटनेनंतर पालिकेकडून पुन्हा नोटीस, तरीही वापर सुरूच…
अलीकडेच रविवारी ५ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास मुंबईतील मानखुर्द भागात तीन मजली इमारत कोसळून सहा मुलांसह एकूण आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर राज्यातील धोकादायक इमारतीचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. यानंतर सोमवारी ६ जुलै रोजी नगरपालिकेने या इमारतीची पाहणी करुन पुन्हा एकदा या इमारतीचा वापर थांबवण्याची आणखी एक नोटीस येथे चिकटवली. तरी देखील बुधवार पर्यंत तरी या इमारती चा वापर सुरु होता. भर बाजारपेठेत नगरपालिकेच्या नोटीसला फाट्यावर मारून धोकादायक इमारतीचा वापर सुरु असताना देखील पालिका प्रशासन इकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे मानखुर्द दुर्घटनेची पुनरा वृत्ती होण्याची पालिका वाट पाहतेय का? असा सवाल उपस्थित होत आहे.
नेमकं काय म्हटलं आहे, नगरपालिकेच्या नोटिशीत?
मालवण येथील म्युनिसिपल घर नं. १८९९ हि इमारत जुनी झाली असल्याने व मोडकळीस आली असल्यामुळे धोकादायक झालेली असल्याचे निदर्शनास आलेले आहे. सदर इमारत कधीही कोसळण्याची शक्यता असून त्यामुळे जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता आहे. सबब, संभाव्य हानी टाळण्यासाठी इमारतीचा वापर चालू असल्यास तो त्वरित थांबवून सदर इमारतीचा धोकादायक भाग / संपूर्ण इमारत त्वरित काढून घ्यावा. इमारतीचा पुनश्चः वापर सुरु करण्यापूर्वी, सदर इमारतीची तपासणी नोंदणीकृत स्ट्रक्चरल इंजीनिअर (Structural Engineer) मार्फत करून घेऊन नोंदणीकृत स्ट्रक्चरल इंजीनिअर यांनी तपासणी प्रमाणपत्र व अहवाल दिल्यानंतर त्यामध्ये इमारतीच्या दुरुस्ती अथवा पुनर्बाधणी संबंधित कोणत्याही सूचना दिल्या असल्यास दुरुस्ती अथवा पुनर्बाधणी संबंधित बदल करण्याचीं कार्यवाही, महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ४४ अन्वये या कार्यालयाची रितसर परवानगी घेऊन पूर्ण करणे आवश्यक आहे. वरील प्रमाणे इमारतीचा धोकादायक भाग काढून घेण्याची तसेच योग्य ती पूर्व परवानगी घेऊन इमारत दुरुस्तीबाबत आपल्याकडून कोणतीही कार्यवाही न झाल्यास व इमारतीच्या कोणत्याही भागाचे नुकसान/पडझड होऊन जीवित व वित्त हानी झाल्यास त्यास सर्वस्वी आपण जबाबदार राहाल याची नोंद घावी.





Subscribe to my channel






