मालवणात संपकरी एसटी कर्मचाऱ्यांची भाजपने घेतली भेट ; पाठिंबा केला जाहीर !
या सरकारला झुकवल्याशिवाय गप्प बसणार नाही : निलेश राणेंचा संपकरी कर्मचाऱ्यांना शब्द
राज्य सरकार झोपी गेलंय का ? माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांचा संतप्त सवाल
कुणाल मांजरेकर
मालवण : एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलगीकरण करण्याच्या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनाला मालवणात भाजपने पाठिंबा दिला आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मालवण आगारात एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन हा पाठिंबा जाहीर केला. माजी खासदार निलेश राणे यांनी दूरध्वनी वरून एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही समस्या असतील तर हक्काने हाक मारा, भाजपचे कार्यकर्ते तुमच्या सोबत कायम असतील, असा शब्द देतानाच या सरकारला झुकवल्या शिवाय गप्प बसणार नाही, असा शब्द निलेश राणेंनी दिला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तर राज्य सरकार तातडीने त्यांची दखल घेतं. आज एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी आत्महत्येसारखे टोकाची भूमिका घेत असूनही राज्य सरकारला त्यांची दखल घ्यावीशी वाटत नाही. त्यामुळे हे राज्य सरकार झोपी गेलेय का? अशा शब्दात माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
भाजपाचे तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी सोमवारी दुपारी मालवण एसटी आगाराला भेट देऊन संपकरी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी आपल्या मागण्यांबाबत कर्मचाऱ्यांनी स्पष्टीकरण देतानाच राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या गांभीर्याने घेत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. यावेळी भाजपाचे प्रभारी शहर मंडल अध्यक्ष विजय केनवडेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, नगरसेवक दीपक पाटकर, गणेश कुशे, उपसभापती राजू परुळेकर, संतोष गावकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुदेश आचरेकर म्हणाले, राज्यातील २२ संघटना या संपात सहभागी झाल्या आहेत. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करावे ही त्यांची प्रमुख मागणी आहे. जोपर्यंत ही मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा निर्वाणीचा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे. भारतीय जनता पार्टी मालवण शहर आणि तालुका या एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे. संपूर्ण राज्यातही भाजपाने एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिला आहे. आज एसटी कर्मचारी मानसिक तणावाखाली येऊन आत्महत्या करीत आहेत. आतापर्यंत ३० ते ३५ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या असतानाही राज्य शासनाने त्यांची दखल घेतलेली नाही. त्यामुळे हे सरकार झोपी गेलय का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. गोरगरीब जनतेला येथे न्याय दिला जात नाही तर श्रीमंतांच्या पाठीशी राज्य सरकार असल्याचे वारंवार दिसून येते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना आमचा पाठिंबाच आहे. मात्र शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या की त्यांची दखल तातडीने घेतली जाते, मग एसटी कर्मचारी आत्महत्या करीत असताना त्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष का ? असा सवाल करून राज्य सरकारने या आंदोलनाची तातडीने दखल घेऊन संपकरी कर्मचाऱ्यांची मागणी त्वरित मान्य करावी, अशी मागणी सुदेश आचरेकर यांनी यावेळी केली.
निलेश राणेंनी साधला संवाद
माजी खासदार निलेश राणे यांनी यावेळी दूरध्वनी वरून संपकरी एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. एसटी कर्मचाऱ्यांची मागणी रास्त आहे. मात्र हे सरकार संपाकडे दुर्लक्ष करून एसटी कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण करीत आहे. भाजपाने या आंदोलनात कर्मचाऱ्यांची भूमिका उचलून धरली असून या सरकारला झुकवल्या शिवाय आम्ही गप्प बसणार नाही. कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही समस्या असतील तर मला हक्काने सांगा, असे निलेश राणे म्हणाले.