सत्ताधाऱ्यांच्या कोट्यवधीच्या वल्गना ; वस्तुस्थिती मात्र भलतीच !

मनसे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकरांच्या आरोपांमुळे खळबळ

कुणाल मांजरेकर

मालवण : सिंधुदुर्गात राज्य सरकारच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी आणण्याचे सत्ताधारी लोकप्रतिनिधींचे दावे संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फ़त झालेल्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या विकास कामांपैकी तब्बल ११३ कोटी रुपये शासन संबंधित ठेकेदारांना देणे असल्याची माहिती मनसेचे प्रदेश सरचिटणीस, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिली आहे. यातील अनेकांनी खासगी सावकारांकडून उसनवारीवर पैसे घेतले असून दोन वर्ष हे पैसे अडकून पडल्याने हे ठेकेदार आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आत्महत्येची वेळ आल्याचे श्री. उपरकर यांनी सांगितले.

दरम्यान, शिवसेना आमदार वैभव नाईक जनतेला नव्या विकासकामांबाबत खोटी आश्वासने देत आहेत. आधी झालेल्या कामांचे पैसे आणा आणि नंतरच नवीन आश्वासने द्या, असे सांगून जिल्ह्यात आमदार, खासदार आणि पालकमंत्र्यांमार्फ़त अदृश्य विकास सुरू असल्याची टीका त्यांनी केली आहे.

मालवण येथील शासकीय विश्रामगृह येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत श्री. उपरकर यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडलं आहे. यावेळी उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, मनविसेचे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर, मनविसे तालुकाध्यक्ष विनायक गावडे, निखिल गावडे, विल्सन गिरकर, प्रणव उपरकर आदी उपस्थित होते. यावेळी श्री. उपरकर म्हणाले, ग्रामीण भागातील बहुतांश सर्वच रस्ते खड्डेमय बनले आहेत. मात्र त्याची दुरुस्ती करण्यात सत्ताधारी लोकप्रतिनिधी अपयशी ठरले आहेत. आरोग्याचीही तीच परिस्थिती असून जिल्ह्यात कोरोनामुळे सत्ताधाऱ्यानी १५०० बळी घेतले आहेत, अशी टीकाही परशुराम उपरकर यांनी केली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!