
बाधित शेतकऱ्यांना मदत व आवश्यक उपाययोजनांसाठी पालकमंत्री नितेश राणेंचे निर्देश
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात पावसाने घेतलेल्या खंडाचा भातपिकाला फटका बसल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नुकसानीचा वस्तुनिष्ठ आढावा घेऊन बाधित शेतकऱ्यांसाठी आवश्यक मदत व उपाययोजनांचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. काही भागांत पावसाअभावी भातपीक करपल्याच्या घटना निदर्शनास आल्याने पालकमंत्री नितेश राणे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबतचा आढावा घेतला. बाधित शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
सावंतवाडी, वेंगुर्ला आणि वैभववाडी तालुक्यांत भातपिकाच्या नुकसानीची प्रकरणे प्रशासनाकडे प्राप्त झाली आहेत. या नुकसानीची अचूक व वस्तुनिष्ठ माहिती संकलित करून प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेण्यासोबतच आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले, कृषी उपसंचालक ज्ञानेश्वर बढे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी बैठकीस उपस्थित होते.
बैठकीत जिल्ह्यातील विविध विकासकामांसह जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचाही आढावा घेण्यात आला. उपलब्ध निधीचा प्रभावी आणि निर्धारित वेळेत विनियोग करण्यासोबतच विकासकामांची गुणवत्ता कायम राखण्यासाठी काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जिल्हा वार्षिक योजनेतील कामांची अंमलबजावणी गतीने होण्यासाठी संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय ठेवण्याची गरजही यावेळी व्यक्त करण्यात आली. दर आठवड्याला अंमलबजावणी यंत्रणांचा आढावा जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी घ्यावा, अशा सूचनाही पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या.






Subscribe to my channel






