पर्ससीन वरील “त्या” कारवाईवेळी भाजपच्या युवा पदाधिकाऱ्याकडून हस्तक्षेपाचा प्रयत्न !
शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी यांचा आरोप ; शिवसेना नेहमीच पारंपरिक मच्छिमारांसोबतच
पारंपरिक मच्छीमारांच्या उपोषणावेळी भेट न देणाऱ्या भाजप जिल्हाध्यक्षांवर टीका
कुणाल मांजरेकर
मालवण : अनधिकृत पर्ससीन मासेमारी मूळे सर्जेकोट बंदरात स्थानबद्ध असलेल्या नौकेवर पर्ससीन जाळी चढवली जात असल्याचा प्रयत्न मत्स्यव्यवसायच्या दक्ष अधिकाऱ्यांनी उधळून लावला. मात्र ही कारवाई सुरू असताना मध्यरात्री भाजपचा वरिष्ठ पातळीवरील एक युवा पदाधिकारी कोणत्या कारणाने मत्स्य अधिकाऱ्यांना कारवाई करू नका सांगत होता, याचा खुलासा भाजप जिल्हाध्यक्षांनी करावा, असे आव्हान शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी यांनी दिले आहे.
पारंपारिक आणि पर्ससीन नेट मासेमारीबाबत शिवसेनेच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यापेक्षा भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून तुमची भुमिका नक्की कोणाच्या बाजूने आहे हे अगोदर जाहीर करा. राज्यात सत्तेत असताना सोमवंशी समिती अहवाल रद्द व्हावा म्हणून पर्ससीनधारकासमवेत तेली मंत्रालयाच्या चकरा मारत होते हे सर्वश्रुत आहे. परंतु मार्च महिन्यात पारंपरिक मच्छीमार साखळी उपोषणास बसले होते तेव्हा तेली कुठे होते, असा सवालही त्यांनी केला आहे.
शिवसेनेची रत्नागिरी, सिंधुदुर्गात पर्ससीन आणि पारंपरिक मच्छिमारी बाबत वेगवेगळी भूमिका असल्याचा आरोप राजन तेली यांनी काल पर्ससीन मच्छिमारांची भेट घेतल्यानंतर केला होता. याला बाबी जोगी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेना कायम पारंपरिक मच्छीमारांच्या बाजूने होती. यापुढे कायम पारंपरिक मच्छीमार यांच्यासोबत कायम असेल. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर पारंपारिक मच्छीमार यांच्या हिताचा निर्णय म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मस्यविकास मंत्री अस्लम शेख, आमदार वैभव नाईक यांनी नवीन कायदा स्थापित केला. त्यामुळे पारंपरिक मच्छीमार व शिवसेना यांचे नाते अतूट आहे, असे ते म्हणाले.