सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसह ऍड. उज्ज्वल निकम ८ जानेवारीला सिंधुदुर्गात !
ऍड. संग्राम देसाई यांची पत्रकार परिषदेत माहिती
सिंधुदुर्गनगरी : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांच्यासह प्रसिद्ध कायदेतज्ञ ऍड. उज्ज्वल निकम ८ जानेवारी रोजी सिंधुदुर्गात येणार आहेत. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲन्ड गोवा यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ते जिल्ह्यात येत आहेत. जिल्ह्यातील नवोदीत वकीलांना मार्गदर्शन तसेच कोल्हापूर खंडपीठाचे प्रयत्न या दृष्टीने हा कार्यक्रम होणार असून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोवा, कोल्हापूर, सांगली, सातारा या भागातील वकील वर्ग देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे उपाध्यक्ष ऍड. संग्राम देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बार असोशिएशनचे अध्यक्ष ऍड. राजेंद्र रावराणे यांनी बार कॉन्सीलच्या जिल्ह्यातील या उपक्रमाचे व ऍड. संग्राम देसाई यांच्या मेहनती बाबत कौतुक करून वकि लवर्गानी या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन केले. यावेळी ऍड. अमोल मालवणकर, ऍड. यतिश खानोलकर, ऍड. अविनाश परब, ऍड. महेश शिंपुगडे, ऍड. प्रणिता कोटकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या वतीने ८ जानेवारी रोजी शरद कृषी भवन सिंधूनगरी येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती प्रकाश नाईक, सिंधुदुर्गचे सुपुत्र व उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे आदी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. दुपारनंतरच्या सत्रात प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ व पद्मश्री अँडव्होकेट उज्ज्वल निकम यांचे नवोदित वकिलांसाठी होणारे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे. २६/११ चा खटला अनेक खटल्यांबाबत त्यांचे अनुभव व मार्गदर्शन या चर्चासत्रात होणार आहे. उच्च न्यायालयाचे दुसरे कायदेतज्ज्ञ ऍड. शेखर नाफडे यांचे कायद्यातील तरतुदी बाबतचे मार्गदर्शन व तिसरे मार्गदर्शक उच्च न्यायालयाचे ऍड. अरविंद आवाड यांचेही अँडव्होकेट ऑन रेकॉर्ड याबाबतच मार्गदर्शन होणार आहे. नवोदीत वकील आणि जिल्हा पातळीवर काम करणाऱ्या वकील वर्गासाठी उच्च न्यायालय अथवा सर्वोच्च न्यायालयात काम करण्यासाठी जी पात्रता लागते, त्यासाठी काय तयारी करावी लागते, याचेही मार्गदर्शन या चर्चासत्रात होणार आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्ह्यातील ७ ज्येष्ठ नामांकित वकीलांचा सत्कार होणार आहे. यामध्ये ऍड. दिलीप वसंत नार्वेकर, ऍड. प्रकाश शंकर रानडे, ऍड. सुभाष गोपाळ पंदुरकर, ऍड. विलास राधाकृष्ण पांगम, ऍड. प्रकाश देवराव परब, ऍड. अजित पांडुरंग गोगटे, ऍड. श्रीकृष्ण ऊर्फ अजित नारायण भणगे यांचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम आणि त्या निमित्ताने या जिल्ह्यात महनीय न्यायमूर्तीचे आगमन हे जिल्ह्यासाठी भुषणावह आहे. असेही ऍड. संग्राम देसाई म्हणाले.