गणेशोत्सवापूर्वी मालवणचे रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी नगरपरिषदेचे प्रयत्न

“कामाचा दर्जा कायम ठेवा, दुरुस्ती टिकाऊ करा” – बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांच्या सूचना

मालवण : गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असताना मालवण शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने दुरुस्तीच्या कामांना वेग दिला आहे. शहरातील प्रमुख रस्ते, वर्दळीची ठिकाणे आणि नागरिकांची मोठी ये-जा असलेल्या मार्गांवरील खड्डे प्राधान्याने बुजविण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.

दरम्यान, सुरू असलेल्या खड्डे बुजविण्याच्या कामाची नगरपरिषदेचे बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी नगरसेवक ललित चव्हाण उपस्थित होते. पाहणी दरम्यान बापर्डेकर यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना “कामाचा दर्जा कायम ठेवा; रस्त्यांची दुरुस्ती केवळ वरवरची नको, तर टिकाऊ पद्धतीने झाली पाहिजे,” अशा स्पष्ट सूचना दिल्या.

गणेशोत्सवात मालवण शहरात नागरिकांसह बाहेरून येणाऱ्या भाविकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे वाहतूक सुरळीत राहावी आणि नागरिकांना सुरक्षितपणे प्रवास करता यावा, यासाठी खड्डे बुजविण्याच्या कामाला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. शहरातील ज्या-ज्या ठिकाणी रस्त्यांची अवस्था खराब झाली आहे, त्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने दुरुस्ती करण्यात येत आहे.

मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रस्ते दुरुस्तीच्या कामात अडथळे निर्माण झाले होते. मात्र, आता परिस्थिती अनुकूल होताच नगरपरिषदेने कामाला गती दिली आहे. उर्वरित सर्व आवश्यक ठिकाणची कामेही लवकरात लवकर पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाचा प्रश्न तसेच गणेशोत्सवाच्या काळातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन रस्ते दुरुस्तीच्या कामात कोणतीही हलगर्जीपणा होऊ नये, यासाठी बांधकाम विभागाकडून कामावर लक्ष ठेवण्यात येत आहे.“आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मालवण शहराच्या विकासाला गती देण्यासोबतच नागरिकांच्या मूलभूत समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी नगरपरिषद कटिबद्ध आहे. रस्ते दुरुस्तीची कामे दर्जेदार आणि टिकाऊ पद्धतीने पूर्ण केली जातील,” असा विश्वास बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!