हातात तिरंगा, ओठांवर देशभक्तीच्या घोषणा…

टोपीवाला हायस्कुलच्या विद्यार्थ्यांची मालवणात प्रेरणादायी तिरंगा रॅली

मालवण : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्तीचा उत्साह आणि राष्ट्रप्रेमाची भावना जागविण्यासाठी मालवण शहरातील अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूलच्या वतीने शहरातून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली.

हातात डौलाने फडकणारा तिरंगा, ओठांवर देशभक्तीपर घोषणा आणि मनात भारतमातेविषयी अभिमान अशा उत्साही वातावरणात विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या रॅलीत सहभागी झाले. ‘हर घर तिरंगा’, ‘देश प्रथम’ तसेच राष्ट्रध्वजाचा सन्मान करण्याचा संदेश रॅलीच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.

मालवण शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करणाऱ्या या रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध संचलनातून राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले.विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना रुजविण्यासोबतच स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाची जाणीव करून देणे आणि राष्ट्राच्या भवितव्यासाठी जबाबदार नागरिक होण्याची प्रेरणा देणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.

तिरंगा हा केवळ राष्ट्रध्वज नसून देशाच्या स्वाभिमानाचे आणि असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे प्रतीक आहे, हा संदेश या रॅलीतून प्रभावीपणे देण्यात आला. टोपीवाला हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी मालवण शहरात निर्माण केलेले देशभक्तीमय वातावरण नागरिकांसाठीही निश्चितच प्रेरणादायी ठरले.

error: Content is protected !!