
मंत्री नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघाती हल्लाबोल; शिवाजी पार्कवर गोमूत्र शिंपडण्याची मागणी
‘रिजिम चेंज’ची भाषा करणाऱ्यांवर निशाणा; संजय राऊतांनाही लक्ष्य करत आदित्य ठाकरेंबाबत केली आक्रमक टीका
ओरोस : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या दसरा मेळाव्यावर मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी जोरदार हल्लाबोल केला. “उबाठाचा दसरा मेळावा म्हणजे शरिया समर्थकांचा मेळावा,” असा आरोप करत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून घणाघाती टीका केली. शिवाजी पार्कवर गोमूत्र शिंपडावे, अशी मागणीही राणे यांनी केली.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल आणि भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री उपस्थित होते. ‘रिजिम चेंज’ची भाषा करणाऱ्यांवर टीका करताना राणे यांनी अभिजित दीपके, उमर खालिद आणि अफजल गुरू यांचा संदर्भ दिला. अभिजित दीपके हे उमर खालिदचे समर्थक असल्याचा दावा त्यांनी केला. दीपके यांचे समर्थन करणारे उद्धव ठाकरे हे अफजल गुरूचे समर्थक असल्याचा आरोपही राणे यांनी केला. हे आरोप करत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
“रिजिम चेंजची भाषा करणाऱ्यांचे तळवे काल शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंनी चाटले,” अशा आक्रमक शब्दांत राणे यांनी टीका केली. बाळासाहेब ठाकरे यांनी ‘गर्व से कहो हम हिंदू हैं’ असा नारा दिला; मात्र त्यांच्याच मुलाला हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात बोलताना पाहावे लागले, अशी टीप्पणीही त्यांनी केली.
राहुल गांधी आणि संजय राऊतांनाही सुनावले
राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात केलेल्या विधानावर उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान राणे यांनी दिले. राहुल गांधींच्या खांद्यावर बसून उद्धव ठाकरे ‘रिजिम चेंज’ करणार असल्याचे संजय राऊत म्हणत असल्याचा उल्लेख करत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
अमित शहा यांच्याबाबत संजय राऊत यांनी केलेल्या विधानांचा संदर्भ देत राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही गंभीर आरोप केले. कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी बोलू नये, असे ते म्हणाले. दिशा सालियन प्रकरणाचा उल्लेख करत त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले.
टायगर श्रॉफ प्रकरणावरून सरकारची पाठराखण
अभिनेता टायगर श्रॉफ यांच्यावरील हल्ल्याचा उल्लेख करत राणे म्हणाले की, फडणवीस सरकारमध्ये गुंडांना पाठीशी घातले जात नाही. हल्ल्यानंतर आंतरराज्य समन्वय साधून राजस्थानमधून संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या कारवाईचा दाखला देत त्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत सरकारची भूमिका मांडली.
‘आदित्य जानेवारी २०२७ पूर्वी तुरुंगात जाईल’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार एप्रिलमध्ये पडेल, असे भाकीत संजय राऊत यांनी केल्याचा संदर्भ देत राणे यांनी त्यांच्यावर टीका केली. “मोदी साहेब प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आहेत. त्यामुळे मोदी सरकार पडण्याचे स्वप्न पाहू नका,” असे ते म्हणाले. यापुढे जाऊन राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्याबाबत जानेवारी २०२७ पूर्वी तुरुंगात जाण्याचा दावा केला. आदित्य ठाकरे यांचे नववर्ष आर्थर रोड कारागृहात जाणार की स्वतःच्या घरी, याची काळजी संजय राऊत यांनी करावी, अशा शब्दांत त्यांनी टीका केली.







Subscribe to my channel






