“कोकण मिरर” इम्पॅक्ट ; कराडमधील “त्या” जोडप्याला ताब्यात घेण्यात यश !
मालवण मधील एका हॉटेल मध्ये जेवणासाठी आले असता पोलिसांनी घेतले ताब्यात
कुणाल मांजरेकर
मालवण : कराड येथील बेपत्ता युवक – युवतीचा मालवणात शोध घेण्यात येत असल्याचे वृत्त “कोकण मिरर” च्या माध्यमातून प्रसिद्ध होताच अवघ्या तीन तासाच्या आत या जोडप्याला ताब्यात घेण्यात मालवण पोलिसांना यश आले आहे. एका हॉटेल मध्ये जेवणासाठी आले असताना या जोडप्याला ताब्यात घेऊन कराड पोलीस आणि त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
कराड येथून १६ नोव्हेंबरला रात्रीच्या सुमारास बेपत्ता झालेल्या तरुण – तरुणीचा पोलिसांकडून मालवणात शोध घेण्यात येत असल्याचे वृत्त “कोकण मिरर डिजिटल न्यूज” मध्ये सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास प्रसिद्ध करण्यात आले. यामध्ये बेपत्ता योगेश बाळासाहेब भिसे (वय २६, रा. साई समर्थ प्लाझा, मंगळवार पेठ कराड) आणि कु. रश्मी भरत खांडेकर (वय २२, रा. मलकापूर कराड) या युवक – युवतीच्या छायाचित्रासह त्यांनी सोबत आणलेल्या ह्युंडाई क्रेटा गाडीचा नंबर आणि छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले होते. जवळपास १५० हून अधिक ग्रुपवरून हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर काही क्षणातच शेकडोंच्या संख्येने वाचकांपर्यंत ही बातमी पोहोचली. त्यानंतर रात्री हे जोडपे शहरातील एका हॉटेल मध्ये जेवणासाठी आले असता “कोकण मिरर” च्या बातमीच्या अनुषंगाने त्यांची ओळख पटवून ही माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी येऊन त्यांना ताब्यात घेतले. यानंतर या दोघांनाही त्यांच्या नातेवाईक आणि कराड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
नेमकं काय होतं प्रकरण ?
योगेश बाळासाहेब भिसे या २६ वर्षीय तरुणाचा २० जून २०१९ रोजी आपली शालेय मैत्रीण सौ. सारिका योगेश भिसे हिच्यासोबत प्रेम विवाह झाला होता. मात्र हा विवाह घरच्याना मान्य नसल्याने ते विभक्त राहत होते. परंतु ३१ मे २०२१ रोजी दोन्ही बाजूंनी संमती मिळाल्यानंतर या दोघांचे कराड येथे पुन्हा एकदा लग्न लावण्यात आले. लग्नानंतर सौ. सारिका ही पाटण सातारा येथील आपल्या माहेरी बाळंतपणासाठी आली. २२ एप्रिल रोजी या दांपत्याला पुत्र प्राप्ति झाल्यानंतर सौ. सारिका माहेरी राहून अधून मधून सासरी येत जात असे. १६ नोव्हेंबर रोजी रात्री तिला नवरा योगेश भिसे याचा फोन आला. पण हा फोन कट झाल्याने तिने वारंवार नवऱ्याला फोन लावण्याचा प्रयत्न केला असता हा फोन लागला नाही. त्यामुळे १८ नोव्हेंबर रोजी ती माहेरहून सासरी कराडला आली असता १६ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास तिचा नवरा योगेश भिसे कोणासही न सांगता घरातून निघून गेल्याचे समजले. त्याच्या अन्य मित्रपरिवाराकडे विचारणा केल्यानंतरही त्याचा ठावठिकाणा न लागल्याने सौ. सारिका हिने कराड पोलीस ठाण्यात योगेश बेपत्ता असल्याची तक्रार दिली आहे.
मंगळवार पेठ येथून योगेश भिसे हा विवाहित तरुण बेपत्ता झालेला असताना याचवेळी मलकापूर कराड येथून कु. रश्मी भरत खांडेकर ही २२ वर्षीय युवती देखील बेपत्ता झाली आहे. ही युवती मलकापूर येथे आई वडिलांसमवेत राहते. १६ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास खांडेकर कुटुंबीय जेवण करून रात्री ११ वाजण्याच्या सुमारास झोपी गेले. मुलगी रश्मी ही स्वतःच्या बेडरूम मध्ये झोपण्यास गेली होती. मध्यरात्री १२.१५ वाजण्याच्या सुमारास श्री. खांडेकर हे झोपेतून उठले असता त्यांना घराचा मुख्य दरवाजा उघडा असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी त्यांनी मुलीच्या बेडरूममध्ये जाऊन पाहिले असता ती त्या ठिकाणी आढळली नाही. तसेच श्री. खांडेकर हे वापरत असलेली एम. एच. ४६ – बीई- ९५४९ ही हुंडाई क्रेटा गाडी देखील या ठिकाणी दिसून आली नाही. त्यामुळे भरत खांडेकर यांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार कराड पोलीस ठाण्यात दिली आहे.
कराड येथून १६ नोव्हेंबरला एकाच रात्रीत बेपत्ता झालेला योगेश भिसे आणि रश्मी खांडेकर ही तरुण – तरुणी एकत्र असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला होता. १७ नोव्हेंबर रोजी युवतीचे लोकेशन मालवण मिळून आल्याने कराड पोलीस ठाण्यातून याबाबत मालवण पोलीस ठाण्यास माहिती देण्यात येऊन कराड पोलिसांचे पथक नातेवाईकांसह मालवणात दाखल झाले होते. याठिकाणी त्यांचा शोध सुरू होता. याबाबत “कोकण मिरर” च्या माध्यमातून वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर या दोघांचाही शोध घेण्यात यश आले आहे.