जलजीवन मिशनची रखडलेली कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट कधी ठरवणार?

माजी आमदार वैभव नाईक यांचा पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना सवाल : वनराई बंधाऱ्यांप्रमाणे जलजीवन मिशनलाही प्राधान्य देण्याची मागणी

सिंधुदुर्ग : पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असताना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर लोकसहभागातून वनराई बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. मात्र, महायुती सरकारच्या काळात रखडलेल्या जलजीवन मिशनच्या कामांचे उद्दिष्ट कधी निश्चित करणार? असा सवाल कुडाळ-मालवणचे माजी आमदार तथा ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी केला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत ७१८ नळपाणी योजनांची कामे हाती घेण्यात आली आहेत. यातील जुन्या नळयोजनांच्या दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत असले, तरी नवीन नळयोजनांचे एकही काम पूर्ण झालेले नसल्याचा दावा वैभव नाईक यांनी केला आहे.

केंद्र व राज्य सरकारकडून आवश्यक निधी उपलब्ध न झाल्याने तसेच निधीअभावी ठेकेदारांकडून कामांकडे दुर्लक्ष होत असल्याने जलजीवन मिशनची कामे रखडल्याचे नाईक यांनी म्हटले आहे. या योजनेसाठी आवश्यक निधी मिळवून कामांना गती देण्यात सत्ताधारी लोकप्रतिनिधी कमी पडल्याचा आरोपही त्यांनी केला. जलजीवन मिशनची कामे वेळेत पूर्ण न झाल्याने दरवर्षी उन्हाळ्यात ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. यंदा त्यात दुष्काळजन्य परिस्थितीची भर पडल्याने आगामी काळात पाणीटंचाईचे संकट अधिक तीव्र होण्याची शक्यता असल्याचे नाईक यांनी नमूद केले. वनराई बंधाऱ्यांप्रमाणेच जलजीवन मिशनच्या रखडलेल्या कामांसाठीही निश्चित उद्दिष्ट ठरवून कालबद्ध पद्धतीने कामे पूर्ण करावीत. तसेच राज्य सरकारकडून विशेष निधी मिळवण्यासाठी पालकमंत्री, खासदार व आमदारांनी पाठपुरावा करावा, अशी मागणी वैभव नाईक यांनी केली आहे.

error: Content is protected !!