महाराष्ट्राची पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल ?
कडक निर्बंध लावण्याबाबत मुख्यमंत्री एक- दोन दिवसांत घेणार अंतिम निर्णय
टास्क फोर्सच्या बैठकीत कडक निर्बंधाबाबत चर्चा : आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती
कुणाल मांजरेकर
राज्यात कोरोनाचे संक्रमण पुन्हा एकदा झपाट्याने वाढत असून कालच्या एका दिवसांत महाराष्ट्र आणि मुंबईत दुप्पटीने कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्याची लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे. राज्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लावण्याबाबत टास्क फोर्सच्या बैठकीत चर्चा करण्यात आली असून याबाबत येत्या एक ते दोन दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेतील, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्यात काल दिवसभरात ३९०० रुग्ण मिळून आले होते. त्यामध्ये आज दुप्पट वाढ झाली असून गुरुवारी ५३६८ रुग्ण मिळाले आहेत. मुंबईत देखील ही परिस्थिती आहे. मुंबईत काल २२०० रुग्ण मिळून आले होते. आज ४००० रुग्ण मिळून आले आहेत. कोरोनाची रुग्ण संख्या एका दिवसात डबल होत आहे. ही परिस्थिती चिंता वाढवणारी आहे. या संदर्भात आज टास्क फोर्स आणि अन्यांशी चर्चा करून निर्बंध घालण्या बाबत विचारविनिमय करण्यात आला. याबाबत एक- दोन दिवसांत मुख्यमंत्री अंतीम निर्णय घेतील, असे ते म्हणाले.
ओमीक्रोनचा अचूक अंदाज घेण्यासाठी sgtf किट मोठ्या संख्येने वापरावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पॉझिटिव्ह येत असलेल्या रुग्णांमध्ये किती ओमीक्रोनचे रुग्ण आहेत, त्याचे अचूक निदान होऊ शकणार आहे. जानेवारी मध्ये १५ ते १८ वयोगटात लसीकरण करणार आहेत, या मुलांना त्यांच्या शैक्षणिक संस्थेत लसीकरण न करता व्हेक्सीनेशन सेंटरवर लसीकरण करावे, याला तत्त्वता मान्यता देण्यात आली आहे. तसेच ज्यांचे लसीकरण झालेले नाही, त्यांचे लसीकरण बंधनकारक करणार असल्याचे ना. टोपे म्हणाले. याबाबत दोन दिवसांत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. ३१ डिसेंबर अनुषंगाने नवीन वर्षाचे स्वागत करताना गर्दी टाळावी, संक्रमण होऊ नये यासाठी घातलेल्या निर्बंधांचे पालन करण्याचे आवाहन देखील राजेश टोपे यांनी करून पुढील वर्ष कोरोना मुक्तीचे असले पाहिजे, त्यासाठी प्रत्येक नागरिकाने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.