
अलिबाग : नागरिकांच्या समस्या ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी थेट जनतेपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्षाच्या वतीने रायगड जिल्ह्यात ‘सेवा अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत अलिबाग येथे आयोजित जनसंपर्क उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र विधान परिषद सदस्य, भाजप कोकण विभागाचे संयोजक तथा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता आमदार प्रमोद जठार आणि संतोष साखरे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत विविध समस्या, मागण्या आणि प्रलंबित कामांबाबतची निवेदने स्वीकारली.
भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या अभियानातून ‘समस्या सांगा, उपायासाठी पाठपुरावा करा’ या भूमिकेतून नागरिकांशी थेट संपर्क साधला जात आहे. विविध शासकीय विभागांशी संबंधित प्रश्न घेऊन नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत आपली निवेदने सादर केली.
यावेळी आमदार प्रमोद जठार यांनी नागरिकांचे म्हणणे आस्थेने ऐकून घेत संबंधित प्रश्नांची माहिती जाणून घेतली. केवळ निवेदने स्वीकारण्यापुरते मर्यादित न राहता, संबंधित विभागांशी समन्वय साधून प्रश्न मार्गी लावण्यासाठी आवश्यक पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
‘सेवा, संवाद आणि समस्या निराकरण’ या त्रिसूत्रीवर भाजपचा भर असून, सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणींना प्राधान्य देत त्यांना दिलासा देण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जातील, असे यावेळी सांगण्यात आले.
अलिबाग येथील भाजप जनसंपर्क कार्यालयात झालेल्या या उपक्रमामुळे नागरिकांना आपले प्रश्न थेट पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसमोर मांडण्याची संधी मिळाली. त्यामुळे जनतेचा प्रश्न थेट पदाधिकाऱ्यांपर्यंत आणि त्यावर तोडग्यासाठी पाठपुरावा, अशी सेवा अभियानाची कार्यपद्धती अधोरेखित झाली.
या अभियानास भाजप दक्षिण रायगड सरचिटणीस सतीश धारप, जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सोपान जांबेकर, ज्येष्ठ नेते गिरीश तुळपुळे, सरचिटणीस ॲड. महेश मोहिते, ज्येष्ठ नेते बिपीन म्हामुणकर, अलिबाग मंडळ अध्यक्ष रोशन भगत, अशोक वारगे, चेतन पाटील, आस्वाद पाटील, सुनील दामले, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष चित्रा पाटील, मंजुषा कुद्रीमोती, उदय काटे, प्रियदर्शिनी, प्राजक्ता दळवी, राजिप कृषी सभापती वैकुंठशेठ पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






Subscribe to my channel






