
मालवण पंचायत समिती येथे अधिकाऱ्यांचे स्वागत : दशावतार कलाकारांची अधिकाऱ्यांकडून नोंदणी
मालवण : आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यातून दशावतार कलाकारांना शासन दरबारी न्याय मिळाला आहे. महायुती सरकार माध्यमातून सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी कलाकार अनुदानात भरघोस वाढ जाहीर केली. कलाकारांची शासन दरबारीं नोंद होऊन त्यांना ओळखपत्रही मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर दशावतारी कलाकारांच्या नोंदणीसाठी मंत्रालयातील अधिकारी सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत. शुक्रवारी या अधिकाऱ्यांनी मालवण पंचायत समिती येथे उपस्थित रहात मालवण तालुक्यातील दशावतार कलाकार यांची नोंदणी केली. 107 दशावतार कलाकार यांची नोंदणी यावेळी करण्यात आली आहे.
दरम्यान, मालवण तालुक्यातील ज्या दशावतार कलाकारांची नोंदणी झाली नाही त्यांनी दशावतार संघटना मालवण तालुका सचिव विनायक येरागी यांच्याशी संपर्क साधून लवकरात लवकर नोंदणी पुर्ण करावी. असे आवाहन पारंपारिक दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघटना सिंधुदुर्ग, मालवण शाखा यांच्या वतीने करण्यात आले आहे.
आमदार निलेश राणे यांनी पावसाळी अधिवेशनात दशावतार कलाकारांचे प्रश्न व्यथा ठामपणे मांडल्या. दशावतार कलाकारांना शासन दरबारी हक्काचा न्याय मिळवून देण्यात आमदार निलेश राणे यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. यासोबत दशावतार कलाकारांची अधिकृत नोंद करून त्यांना पुढील लाभ मिळावेत आणि एकही कलाकार या लाभापासून वंचित राहू नये यासाठी दशावतार कलाकार नोंदणी करण्यात यावी अशीही भूमिका आमदार निलेश राणे यांनी मांडली. त्यानुसार सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या निर्देशानुसार सांस्कृतीक कार्य संचालनालयाचे अधिकारी दशावतार कलाकार सर्वेक्षण आणि नोंदणी साठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले आहेत.
शुक्रवारी सांस्कृतीक कार्य संचालनालय सांस्कृतिक विभाग मुंबईचे सहाय्यक संचालक जयश्री घुगे, लेखाधिकारी गायत्री वेजारे, लिपिक सहदेव खैरे मालवण पंचायत समिती येथे दाखल झाले. यावेळी गटविकास अधिकारी परागिणी पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी पांडुरंग सावंत, उपसभापती घनश्याम झाड, पारंपारिक दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघटना सिंधुदुर्ग, मालवण शाखा अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, उपाध्यक्ष ओमप्रकाश चव्हाण, सचिव विनायक येरागी सहसचिव विनोद परब, सल्लागार चंद्रकात खोत, खजिनदार नितीन घाडीगावकर, सदस्य भास्कर मुसळे, श्रेयश खोत, दिनेश राऊळ, रुपेश चौकेकर, सुधीर तांडेल, सुहास माळकर, भाई मांजरेकर यांसह दशावतार कलाकार उपस्थित होते. मालवण तालुक्यातील 107 कलाकारांची नोंद दिवसभरात करण्यात आली. अशी माहिती देण्यात आली.





Subscribe to my channel






