कोरोना वाढीमुळे पर्यटन व्यवसाय ठप्प ; व्यावसायिक उद्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार
पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष बाबा मोंडकर यांची माहिती
मालवण : कोरोना रूग्णसंख्या वाढीमुळे शासनाच्या पर्यटन स्थळे बंदचे आदेश दिले आहेत. या आदेशाने जिल्ह्यात सागरी, ऍग्रो, निसर्ग, जलक्रीडा पर्यटनासाठी येणारे पर्यटक पूर्णपणे बंद झाले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात या व्यवसायातील लोकांसमोर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे या संदर्भात पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्गच्या वतीने जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांची बुधवारी १९ जानेवारीला सकाळी ११ वाजता भेट घेण्यात येणार आहे. या भेटीत पर्यटन व्यावसायिकांना दिलासा देण्यासंबंधी शासनाने विचार करावा यासाठी मागणी केली जाणार आहे.
जिल्ह्यात पर्यटन व्यवसाय कोरोना व्हायरस मुळे गेले दोन वर्षें बंदस्थितीत आहे. गेल्या दोन महिन्यात थोड्याफार प्रमाणात पर्यटन पूर्वपदावर येत असताना ओमिक्रोन व कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरसकट पर्यटन स्थळे बंद ठेवण्याचे आदेश स्थानिक प्रशासनामार्फत देण्यात आले आहेत. जे पूर्ण पणे चुकीचे आहेत. जिल्ह्यातील पर्यटन स्थळे निर्बंधासह चालू करण्यात यावीत, तसेच सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक, जलक्रीडा व्यवसाय कोविड निर्बंधाचे पालन करून सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात यावेत. जेणेकरून कोविड नियमावलीचे पालन करून पर्यटक जिल्ह्यात येतील, अशी विनंती पर्यटन महासंघातर्फे करण्यात येणार आहे. या आदेशामध्ये बदल न झाल्यास या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या टूर गाईड, वाहन चालक, हॉटेल, रेस्ट्रॉरंट, रिक्षाचालक, स्कुबा डायव्हिंग, जलक्रीडा व्यावसायिक, सिंधुदुर्ग किल्ला होडी चालक, होमस्टे धारक याच्यावर उपासमारी व उध्वस्त होण्याची वेळ येणार आहे. स्थानिक प्रशासन व राज्य सरकार कडून कुठलीही आर्थिक मदत स्थानिक पर्यटन व अन्य व्यावसायिकांना मिळालेली नाही. आजही पर्यटन व्यावसायिक या कर्जाच्या बोजातून बाहेर येण्यासाठी व्यावसायिक पातळीवर प्रयत्न करत आहेत. त्यामुळे याबाबत पर्यटन व्यावसायिकांच्या वतीने चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती बाबा मोंडकर यांनी दिली.